लोकप्रिय होऊ पाहणारा कलाव्यवहार अपरिहार्यपणे लोकानुनयही करत असतो. त्यामुळे लोकमानसावर ज्या मान्यतांचे आणि अभिरुचीचे पगडे आहेत, त्यांचाही अनुनय या कलाव्यवहाराला करावा लागतो. स्वाभाविकच या कलाव्यवहाराभवती अर्थकारणही जमा होते. शिवाय तो त्या-त्या भाषिकप्रदेशाच्या, आर्थिक-राजकीय सत्ताकेंद्रांशी एकवटला जातो. या केंद्रिकरणातून विविधतेचा बळी जातो आणि विकेंद्रीकरणाचे उतारे शोधणे अपरिहार्य होऊन बसते.
कोणत्याही कलाव्यवहारांमध्ये प्रामुख्याने दोन धारा अस्तित्वात असतात. यातील एक धारा लोकरंजनकेंद्री असल्यामुळे ती लोकप्रिय असते. दुसरी धारा रंजनाहून अधिक महत्त्व तत्त्वचिंतनाला देत असते. हे तत्त्वचिंतन केवळ जीवनाविषयीचे नसते, तर कलेच्या रूपाविषयीचेही असते. प्रत्येक कलाव्यवहारांमध्ये हे घडताना आपल्याला पाहता येते. कधीकधी अभावाने, लोकप्रियता आणि तत्वचिंतन यांची मूल्ये परस्परात विरघळून, दोन्ही प्रकारचे मूल्यव्यवहार समतोलपणे सांभाळणारा कलाव्यवहारही निपजतो. परंतु असे अभावानेच घडते.
लोकप्रिय होऊ पाहणारा कलाव्यवहार हा लोकानुनयही अपरिहार्यपणे करत असतो. त्यामुळे लोकमानसावर ज्या मान्यतांचे आणि अभिरुचीचे पगडे आहेत, त्यांचाही अनुनय या कलाव्यवहाराला करावा लागतो. ताणहरण आणि रंजन हे या कलाव्यवहाराचे प्राण असतात. या प्रकारच्या कलाव्यवहाराचा प्रमुख हेतू अनुभव देणे हा नसून संमोहित करणे हा असतो. स्वाभाविकच या कलाव्यवहाराभवती अर्थकारणही जमा होते. अशाप्रकारच्या कलाव्यवहाराला व्यापक जनमान्यता लाभल्याने त्याचा वापर कलाबाह्य व्यवस्थानांही करावा वाटू लागतो. एखादा चित्रपट, टेलिव्हिजन मालिका, नाटक प्रचंड लोकप्रिय ठरले तर त्याच्याभोवती; जाहिरातदार, उद्योजक, व्यापारी, राजकारणी व्यवस्थादेखील गोळा होतात. या व्यवस्थांना कोणत्याही कलाव्यवहाराशी मतलब नसतो, तर त्यानिमित्ताने त्यांना एक आयता संमोहित जनसमूह लाभणार असतो. एखाद्या कलाकृतीने संमोहित केलेला जनसमूह वापरून, त्यांना स्वतचे हेतू रेटणे शक्य होणार असते. पर्यायाने या संमोहिनवादी कलाव्यवहाराला; लोकमान्यता, राजमान्यता आणि आर्थिकमान्यताही लाभते. एखाद्या भाषिक परिघातील कलाव्यवहार त्या-त्या भाषिकप्रदेशाच्या, आर्थिक-राजकीय सत्ताकेंद्रांशी एकवटला जातो. त्या-त्या प्रदेशातील समग्र कलाव्यवहारही मग या सत्ताकेंद्राच्या मान्यतेसाठी बांधील बनतो. ही सत्ताकेंद्रे, कलाव्यवहाराचे निकष ठरवू पाहतात. सत्ताकेंद्रांचा अनुनय करण्राया कलाव्यवहाराला ‘मुख्यधारा‘ आणि न करण्राया कलाव्यवहाराला ‘समांतर‘ म्हणून संबोधण्याचेही प्रघात पडतात.
या केंद्रिकरणातून अर्थातच विविधतेचा बळी जातो आणि विकेंद्रीकरणाचे उतारे शोधणे अपरिहार्य होऊन बसते. मराठी नाटक या विकेंद्रीकरणाच्या प्रािढयेतून सातत्याने जात आलेले आहे. एकेकाळी मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचे प्रचंड प्राबल्य होते. त्याकाळात गद्य नाटकाला अस्तित्वासाठी झगडावे लागलेले होते. त्यापुढच्या काळात मराठी नाटक, शहरी- मध्यमवर्गीय-पांढरपेशी जाणिवांमध्ये बांधले गेले. अर्थातच, आपल्याला हे ही ध्यानात घ्यायला हवे की मुख्यधारेमधला साराच कलाव्यवहार मूल्यहीन असत नाही. त्यात मूल्ययुक्तता असतेच. ही मूल्ययुक्तता, कलामूल्ये आणि जीवनमूल्ये या दोन्हींमध्ये संचरत असते. कलाकृती गणिक या मूल्ययुक्ततेला व्यक्त करण्याची गुणवत्ता कमी-अधिक असू शकते. परंतु सत्ताकेंद्रनिष्ठ कलाकृतींना मिळणारी व्यापक मान्यता पाहून त्यांचे साचे बनतात, ते आळवले जातात आणि कलाव्यवहाराचे केंद्रीकरण होऊन तो एकांगी बनायला लागतो.
कोणताही मानवनिर्मित अथवा कल्पित प्रांत-प्रदेश हा अंतर्गत विविधतेने भरलेला असतोच. या विविधतांच्या सांगडीतून एक नवी विविधता साकारते. जी भाषा, बोली, जीवनदृष्टी, कलारूपे, विविधतासापेक्ष तत्त्वचिंतन, शैली यांमधून आविष्कृत होते. नाटकासंदर्भात बोलायचे झाले तर, विविधतेतून साकारलेले जीवन आणि याच विविधतेतून साकारलेल्या प्रयोगपद्धती-मंचनपद्धती सर्वदूर अस्तित्वात असतात. लोकपरंपरेतील सादरीकरण प्रकार पाहायचे तर वैदर्भीय खडीगंमत, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील तमाशा, कलगी-तुरा दशावतार, सोंगीभजने आदि प्रकारांची स्वतची अशी प्रयोगमूल्ये आहेत. ही मूल्ये त्या-त्या प्रदेशातल्या जीवनशैलीतून-संस्कृतीतून विकसित झालेली आहेत. याच प्रकारचे वैविध्य महाराष्ट्रभर केल्या जाण्राया नाटकांमध्येही अस्तित्वात असू शकते. गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रांतोप्रांतीची स्थानिक रंगभूमी आणि रंगकर्मी, आपापल्या नाटय़जाणीवेचा आविष्कार करत महाराष्ट्रभर प्रयोगही करत आहेत. परंतु यात सत्ताकेंद्राचा अनुनय किती दिसतो आणि आपापल्या विविधता प्रमाण मानून घेतलेला स्वशोध किती दिसतो, याचे मूल्यांकन होणेही अत्यंत आवश्यक आहे. एकूणच मराठी नाटय़व्यवहाराच्या स्वास्थ्यासाठी हे लाभदायक ठरेल. जागतिकीकरणाच्या-उदारीकरणाच्या काळानंतर तर सपाटीकरणाचा आणि कलेच्या वस्तुकरणाचा मोठाच रेटा निर्माण झालेला आहे. सत्ताकेंद्रे प्रत्यक्षातुन आभासी जगात पांमित झालेली आहेत. त्यामुळे विकेंद्रीकरणाचा-विविधतेतून साकारणार्या विपुलतेचा शोध आणखीनच बिकट होऊन बसलेला आहे. याचमुळे केंद्रीकरणाच्या संमोहनाला उत्तर देण्राया नाटय़वहाराचा शोधही निकडीचा बनलेला आहे.
हिमांशू भूषण स्मार्त
(लेखक नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)