परीक्षण- चैतन्याने भारलेला प्रवासानुभव

>> श्रीकांत आंब्रे

प्रवासवर्णन हा मराठीत अधिकाधिक बहरत चाललेला वाङ्मय्यप्रकार. लेखकाची जशी दृष्टी असेल तशी प्रवासातील सृष्टी त्याला भावते. जर ही दृष्टी परिपक्व असेल आणि तिला लेखकाच्या प्रतिभासामर्थ्याचा किंवा त्याच्या खास शैलीचा स्पर्श असेल तर ते प्रवासवर्णन म्हणजे सुंदर कलाकृती ठरते. बहुपैलू असलेले ज्ये÷ साहित्यिक डॉ. आशुतोष जावडेकर य्यांचं ‘दिशा आणि वाटा – काही प्रवास नोंदी’ या शीर्षकाचे प्रवासवर्णन हे त्य्य्याहून अधिक काहीतरी देणारे आहे. पारिस, स्वित्झर्लंड, स्पेन, बाली, इंडोनेशिया, आव्हान तीरी असलेले शेक्सपीयरचे गाव इतक्या मोजक्याच परदेश प्रवासाचे आणि मदुराई, दिल्ली, गोवा, फोंडा, पूर्णगड, रत्नागिरी यासह शूटिंगचे प्रवासानुभव, आगगाडीतून केलेले प्रवास, विमानाचे प्रवास या देशी प्रवासातील अनुभव आशुतोष आपल्या खास ढंगात गप्पिष्टपणे सांगतो.

अद्भुत निसर्गाच्या विविधरंगी रूपाचे नजारे पाहून अंतर्मुख होतो. एरव्ही मात्र तो या प्रवासावर स्वार होउढन बेधडकपणे प्रवासातील अडचणींना, कठीण प्रसंगांना मनाला सुचेल त्या प्रकारे सामोरा जातो. क्षणात मेट्रोत तर क्षणात बोटीवरच्या आार्केस्ट्राची मजा लुटत बसतो. पंधरा पंधरा किलोमीटर पायी चालून होणारी दमछाक, मेट्रोतील उलट-सुलट प्रवास, रेल्वे प्लाटफार्म शोधताना होणारी धावपळ, दगदग, फसगत, हेलपाटे, कुचंबणा, माणसांचे नाना तऱहेचे स्वभाव, त्यांच्या स्वाभाविक प्रतिक्रिया, अनोख्या ऐतिहासिक अतिशय जुन्या काळातील वास्तू, भारतापेक्षा वेगळी वाटणारी निसर्गाची रूपे, सायंकाळी सात वाजले तरी लख्ख सूर्यप्रकाश, गात्रं गोठवणारी थंडी, नागवा पाऊस या साऱयाची प्रचीती लेखकाच्या शब्दांतूनच अनुभवायला हवी.

अनोख्या वातावरणात ‘गुगल माप’ हाच मित्रासारखा एकमेव सोबती ठरतो. प्रवासात कितीही अडचणी आल्या तरी या वल्लीचा आत्मविश्वास खचत नाही किंवा निराशेचे मळभ त्याच्यावर दाटून येत नाही. या प्रवासात पाहिलेल्या काही गोष्टींची, अनुभवांची आपल्या पुण्यातील गोष्टींशी, अनुभवांशी तुलना करून पाहण्याची सवय मात्र कायम मनात रुजलेली.

पारिसच्या आयफेल टावरचं स्थापत्य सौंदर्य त्याला भुरळ घालतं. स्वित्झर्लंडमधल्या पर्वतरांगांतील प्रचंड पाऊस, बर्नमधले आइन्स्टाइनचं उपेक्षित घर, तिथले संसद भवन, गाजलेली स्विस बँक, श्रीमंतीची मस्ती असलेल्या या देशांतही दिसलेले भिकारी, देखण्या बोटीतून केलेला स्वप्नवत प्रवास, लाटरब्रुझेनचा विराट धबधबा, एखाद्या जिवंत कवितेसारखं भासणारं स्पिएझ गाव, स्वतःची गती, वाट, शिस्त असलेले झुरिक गाव, तिथे आलेले वर्णभेदाचे कटू अनुभव, वरून स्वस्थ अन् आतून अस्वस्थ असलेली स्विस मने त्याला अस्वस्थ करतात. बालीमध्ये बेसुमार वाढलेले पर्यटन, महाभारतातील सुंद-उपसुंदाची कहाणी नृत्य नाटिकेत सादर करणारे भारतीय वंशाचे पथक, दैवयोगाने स्कुबा डायव्हिंगच्या हादरवून टाकणाऱया अनुभवातून झालेली सुटका, अव्हान तीरी शेक्सपीयरच्या गावातील संस्मरणीय आठवणी हे सारे परदेशी प्रवासाचा निरोप घेताना लेखकाला विसरता न येण्याजोगे, मनात ठाण मांडून बसणारे.

या प्रवासात त्या-त्या ठिकाणांना लगटून काही आठवणी येतात. तर कधी कहाण्यांमधून, माणसांमधून, निसर्गदृश्यांमधून लेखकाचं मनसोक्त रमणं दिसतं. कित्येकदा हा प्रवास केवळ बाहय़ स्वरूपाचा नाही, तर तो आतलाही प्रवास आहे हेही जाणवत राहते. लेखक केवळ ठिकाणांचे, त्याच्या काळाचेच वर्णन करून थांबत नाही, तर इतिहास आणि संस्कृतीच्या मुद्दय़ांनाही तो स्पर्श करतो. हा सर्व देशी-विदेशी प्रवास तो मनस्वीपणे जगतो. त्या अनमोल आनंदाच्या आठवणीचे क्षण वाचकांना भेट देऊन समाधान पावतो.

दिशा आणि वाटा ः काही प्रवासनोंदी

लेखक ः डॉ. आशुतोष जावडेकर

प्रकाशक ः पद्मगंधा प्रकाशन

पृष्ठे ः 191,  मूल्य ः 350/-