मनतरंग – सप्तपदी सुरू करण्यापूर्वी…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

दिव्या नेरुरकर–सौदागर

हल्ली विवाहपूर्व समुपदेशन घेण्यास तरुणांचा कल वाढताना दिसत आहे. हल्लीची तरुणाई लग्नाच्या बाबतीत ‘ताक फुंकून पिणारी’ आहे. त्यामुळेच सध्या विवाहपूर्व समुपदेशनासाठी येणाऱयांमध्ये तरुण मुलांची संख्या अधिक असते. लग्नसंस्थेतील सध्याच्या ताणाचे स्वरूप पाहता ‘लग्नसंस्था आणि जोडीदार’ याबाबत संवेदनशील आणि सजग असणं ही सध्याच्या काळाची गरज आहे, हे लक्षात येतं. 

 

अजितने (नाव बदलले आहे) फोनवर अपॉइंमेंट घेतली होती. तो काहीसा घाईत वाटत होता.

‘हॅलो मॅम, तुमच्याशी जरा मला अर्जंटली बोलायचं होतं. आजचीच अपॉइंमेंट मिळू शकेल ना मला?’ फोनवर त्याने विचारून घेतलं आणि ठरल्या वेळी तो आला.

‘मॅम, माझ्या घरचे माझ्या लग्नाचं बघताहेत. एक-एक स्थळं माझ्यासाठी येत आहेत. मी आधी हे सगळं एन्जॉय करत होतो, पण आता थोडा टेन्शनमध्ये आलोय.’

‘कसलं टेन्शन आलंय तुला?’

’डोन्ट नो! मे बी लग्न! कारण इट्स अ बिगेस्ट कमिटमेंट अॅण्ड रिस्पॉन्सिबिलिटी आफ्टर ऑल.’

‘पण मग त्याचं टेन्शन म्हणजे नक्की काय?’

असं म्हणताच तो थोडासा हसला. ‘तेच समजत नाहीये मॅम मला. मी एका मुलीबरोबर संसार सुरू करणार आहे जी मला नीटशी माहीतही नाही आणि तिच्या बायोडेटाखेरीज माझ्याकडे काहीही नाही. आता मीटिंग्स होतीलही आमच्या, पण त्यात समोरची व्यक्ती पूर्णपणे समजतेच असं नाही.’

’बरोबर आहे तुझं म्हणणं. आपल्याला स्वतचीच ओळख पटायला वेळ लागतो. ही तर दुसरी व्यक्तीच आहे ना?’ अजितने पुन्हा हसून मान डोलावली.

’त्यासाठीच मी इथे आलोय. मी आता कुठे स्वतला ओळखू लागलो आहे. स्वतचे चांगले-वाईट गुण हेही समजायला मला लागले आहेत. त्यासाठी तर तुमच्याकडे मी जवळपास सहा महिने समुपदेशनासाठी येतच होतो. आता मला माझ्या या नव्या जबाबदारीसाठी पुन्हा सज्ज व्हायचंय. मला उत्सुकता, टेन्शन अशा सगळ्याच मिक्सड् फिलिंग्स आहेत लग्नाबद्दल.’

अजित हा स्वभावाने अत्यंत संवेदनशील, नम्र आणि अतिशय विचारी असा 27 वर्षांचा तरुण मुलगा होता. जवळपास वर्षभरापूर्वी त्याने त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाकरिता काही समुपदेशन सत्रे घेतली होती. आता काही महिन्यांनंतर अजितने त्याच्या भावी आयुष्याच्या नवीन प्रवासासाठी पुन्हा एकदा समुपदेशनाचा मार्ग अवलंबला होता. कारण त्याला त्याचा जोडीदार निवडतानाची जबाबदारी स्वतच पार पाडायची होती.

‘मला नंतर पश्चाताप वगैरे काही करायचा नाही. मला माझं आयुष्य माझ्या बेटरहाफबरोबर व्यवस्थित आणि समाधानाने जगायचं आहे.’ अजित एक-एक वाक्य समंजसपणे बोलत होता.

हल्ली विवाहपूर्व समुपदेशन घेण्यास तरुणांचा कल वाढताना दिसत आहे. हल्लीची तरुणाई लग्नाच्या बाबतीत ‘ताक फुंकून पिणारी’ आहे. माझ्याकडे विवाहपूर्व समुपदेशनासाठी येणाऱयांमध्ये तरुण मुलांची संख्या अधिक आहे. यावरूनच ‘लग्नसंस्था आणि जोडीदार’ याबाबतीत ही मुलं किती संवेदनशील आणि सजग आहेत हे समजतं.

‘माझ्या काही मित्रांनी सांगितलं की मुलगी पहिल्या वर्षी व्यवस्थित सासरी वागते. दुसऱया वर्षापासून स्वतचे खरे रूप दाखवते. म्हणून बायकोला जर वरचढ होऊ द्यायचं नसेल तर पहिल्यापासूनच तिला धाकात ठेवलं पाहिजे.’

अजित आता त्याला त्याच्या काही तज्ञ (?) मित्रांकडून मिळालेले सल्ले सांगायला लागला. त्याला एक अनाहूत सल्ला असाही मिळालेला होता की, लग्नाच्या पहिल्या रात्री बायको जर शरीरसंबंधात जास्तच रस आणि सगळ्या ‘स्टेप्स’ व्यवस्थित करत असेल तर तिचं नक्कीच आधी कधीतरी… कोणाबरोबर तरी हे सगळं होऊन गेलेलं असणार. ‘मॅम, हे सल्ले मला असह्य झाले. कारण मी स्वत मुलींचा रिस्पेक्ट करतो आणि मला माझ्या होणाऱया बायकोला सार्वजनिक करायचं नाही. मला खासगी राहायला आवडतं. म्हणून तुम्ही सांगा. मी माझ्या वैवाहिक जीवनात कसा राहू?’ त्याने विचारले.

वर उल्लेखलेले सल्ले हे प्रातिनिधिक स्वरूपाचे होते आणि तुम्हा वाचकांच्याही कानावर कधीतरी आलेले असतीलच. लग्नानंतर नवरा-बायकोत पहिली ठिणगी उडते ती अशा आगाऊ आणि पोकळ सल्ल्यांमुळेच. त्यात भर असते ती सासरची माणसं कशी वर्चस्व गाजवणारी असतात किंवा स्वतच्या मानात राहायचं असेल तर कशाप्रकारे आकांडतांडव करणं सोयिस्कर असतं या अशांसारख्या गोष्टी लग्नेच्छुक मुलामुलींच्या मनात कुठल्या न् कुठल्या माध्यमांतून भरवल्या जातात आणि त्यांच्या मनातील उत्साहाची जागा अकारण चिंता आणि काळजीने व्यापते. हे सगळं त्या मुलांचा आत्मविश्वास कमी करतंच, पण त्यांच्या आयुष्यात येणाऱया खास व्यक्तीबद्दलही उगाचच मनात गैरसमजही निर्माण करून जातं… त्यांच्याही नकळत.

’मग असे सल्ले टाळायचे कसे?’ अजितने भाबडेपणाने विचारलं. ’लक्ष न देऊन’ हे त्याचं उत्तर होतं. त्याबरोबरच त्याला लग्नाचा विचार करताना काही गोष्टींवर काम करण्यास सांगण्यात आलं. जसं की; स्वतचा आणि जोडीदाराचा वास्तववादी विचार करणं. स्वतच्या आणि जोडीदाराच्या कुटुंबपद्धतीबद्दल जाणून घेणं, स्वतची आणि जोडीदाराची मतं स्पष्ट मांडणं आणि ऐकणं, एकमेकांबद्दल असलेल्या अपेक्षांबद्दल चर्चा करणं, नात्याचा आदर करणं.

’मग मला सांग अजित; या सगळ्यात महत्त्वाचं काय असावं असं तुला वाटतं?’ असं त्याला विचारल्यावर तो पटकन म्हणाला, ‘एकमेकांशी मनमोकळं बोलणं आणि स्पेस देणं मला महत्त्वाचं वाटतं.’

‘बरोबर आहे तुझं. जितकी नात्यात मोकळीक आणि पारदर्शकता असेल तितकं नातं खुलणार. त्यात वरचढपणा, तुलना या सगळ्याची गरज नाही.’

’खरं आहे मॅम. माझ्या काही मित्रांची मॅरिड लाईफ यामुळेच स्पॉईल झाली आहे, पण आता मला कळलंय सगळं.आता टेन्शन असूनही मला छान वाटतंय. असं का?’

’छान वाटण्याचं कारण तुला आलेला ताण हा युस्टेस (ल्sिंtrाss) प्रकारातला आहे. म्हणजेच सकारात्मक ताण. यामध्ये नवीन सुरुवात, नवीन आव्हानं अनुभवावीशी वाटतात आणि त्याचबरोबर आपण ती व्यवस्थित कशी करू शकू ही एकच गोष्ट डोक्यात असते. त्यामुळे डोन्ट वरी. हा ताण गरजेचा आणि हेल्दी आहे.’ असं हसत-हसत त्याला सांगितलं गेलं. पुढच्याच महिन्यात त्याची लग्नपत्रिका मिळाली आणि त्याचा आश्वासक फोन आला.

‘तुमच्याकडे एकदा तिला घेऊन येतो. लग्न झाल्यावर आम्हाला अजून काही प्रश्नांबाबत मार्गदर्शन हवंय.’ त्याच्या स्वरात उत्साह होता.

‘नक्की.’ असं बोलून अजितला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

[email protected]

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)