
>> विनायक
महाराष्ट्राला लाभलेल्या भक्कम सह्याद्रीचं लेणं पर्यावरणाच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचं ऐतिहासिक महत्त्व आपण सारेच जाणतो. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण देशाच्या वातावरणावर, ऋतुचक्रावर आणि पर्यावरणावर सह्याद्रीच्या सातपुड्यापासून सुरू होणाऱ्या व पश्चिम सागर किनाऱयालगत थेट केरळ-तामीळनाडूपर्यंत 1600 किलोमीटर पसरलेल्या पर्वतराजी किंवा पश्चिम घाट हा महाराष्ट्रासह देशाचाही अनेक प्रकारे ‘त्राता’ आहे याची कल्पना किती जणांना असते? सह्याद्री आणि पुढे हीच पर्वतरांग नीलगिरी, मलयगिरी होते तो सलग उंच डोंगरदऱयांचा पट्टा सुमारे 16000 चौरस किलोमीटरचं क्षेत्र व्यापतो.
गोंडवना लॅन्ड या महाखंडाचे तुकडे होऊन हिंदुस्थानी उपखंड पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाकडे सरकायला लागलं आणि पश्चिमेच्या आफ्रिका खंडापासूनही तुटलं तेव्हापासून सह्याद्री आहेच. हे उपखंड युरेशियन उपखंडाला धडकलं त्या वेळी त्यातून हिमालय उत्पन्न झाला.
अशा या अतिप्राचीन सह्याद्रीचे आणि पश्चिम घाटाचे आपण वारसदार, पण आपण म्हणजे केवळ माणसं नव्हेत. सरासरी 4000 फूट उंच शिखरं असलेल्या आणि दक्षिणेतील 8842 फूट उंचीचं शिखर अभिमानानं मिरवणाऱया पश्चिम घाटाच्या अंगाखांद्यावर लाखो वर्षांपासून विलक्षण जैववैविध्य वास करून आहे. निसर्गाचे हे दुर्मिळ देणे हा एक जागतिक ठेवा आहे. इथे जगातल्या अतिदुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांचा अधिवास आहे. प्रदूषण आणि मानवी उपद्व्यापामुळे आज या निसर्गाच्या दौलतीचा घास घेतला जातोय.
पश्चिम घाटाच्या उत्तुंग पर्वतराजींचे अनेक उत्तम परिणाम आपल्या देशवासीयांचं जीवन नियंत्रित आणि सुखी करतात. देशात जूनमध्ये येणारा मौसमी पाऊस चार महिने टिकतो ही सह्याद्री आणि पश्चिम घाटाचीच देणगी. दक्षिण गोलार्धात सध्या जो भयंकर उन्हाळा सुरू आहे त्यामुळे होणारी सागरी पाण्याची वाफ हळूहळू वातावरणाच्या वरच्या थरात साठत जाईल. साधारण एप्रिलनंतर ती पश्चिम (नैऋत्य मान्सूनपूर्व) वाऱयांकडून आपल्या उपखंडाकडे वळेल. आकाशात दाटीवाटीने पुढे सरकणाऱया या विशाल मेघमालेचा सह्यकडय़ांचा 1600 किलोमीटरचा विस्तार अडवेल आणि जूनमध्ये पाऊस पडू लागेल. अतिउंचावरचे ढग कोरडे होऊन पूर्वेकडे जातील आणि त्यांना इस्टर्न घाट किंवा पूर्वेच्या महेंद्रगिरी पर्वतरांगेतील ढग मिळतील व देश पर्ज्यन्यधारांनी चिंब होईल.
पश्चिम घाटाच्या याच परिसरात देशातील 30 टक्के झाडं-पानं आणि प्राणी यांच्या प्रजाती आढळतात. म्हणजे देशातील जैविक धनापैकी एकतृतीयांश ‘धन’ केवळ पश्चिम घाटामध्ये सामावलेलं आहे. इतकं घनदाट जंगल आणि विविध प्रजातींना जगण्यासाठीचं सुयोग्य, उष्ण, समशीतोष्ण वातावरण मिळाल्याने आज जगातल्या सर्व प्रजातींपैकी 325 मौलिक प्रजाती पश्चिम घाटात असून त्या अनेक कारणांनी नामशेष होण्याच्या मार्गावर असणे ही एक जैविक शोकांतिका म्हणावी लागेल.
पश्चिम घाटातील वनस्पतींचा आढावा घेतला तर गगनस्पर्शी वृक्षांपासून जमिनीलगतच्या हिरवळीपर्यंत आणि शेवाळाच्या विस्तारापर्यंत सर्व प्रकारच्या असंख्य जैववैविध्य असणाऱया वनस्पती आढळतात. याच पट्टय़ात सुमारे 54000 चौरस किलोमीटरची दाट पर्जन्यवने असल्याने तेथील जैवसंपत्ती तर अपार आहे. वर्षभर फुलणाऱया, फळणाऱया वनस्पतींपासून पानगळीच्या वृक्षांपर्यंत सारे काही येथे सापडेल.
हे झालं ‘फ्लोरा’ म्हणजे पानाफुलांविषयी. त्यांच्या इतक्याच ‘फौना’ म्हणजे सजीवांच्या दुर्मिळ प्रजातीही याच भागात सापडतात. त्यापैकी काही म्हणजे संरक्षणासाठी सुक्या पानाच्या रंगासारखी पाठ असणारा बेडूक, 11 प्रकारचे महत्त्वाचे मासे, 120 प्रकारचे सस्तन प्राणी, 508 प्रजातींचे पक्षी (शिवाय स्थलांतरीत वेगळे), सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 156 प्रजातींचा वावर, बिबटय़ासारखी दिसणारी मांजर (लेपर्ड-कॅट), 985 वाघ, 11000 रानहत्ती आणि 6000 प्रकारचे कीटक या साऱ्यांना पश्चिम घाटाने एकविसाव्या शतकातही उदार आसरा दिलेला असेल तर काही हजार वर्षांपूर्वी इथली जैविक समृद्धी किती असेल!
परंतु पृथ्वी ‘गिळत’ चाललेल्या माणसाची हाव भस्मासुरी. एकूणच जगभरचं पर्यावरण आणि जैविक संतुलन धाब्यावर बसवून माणूस त्याची ‘प्रगती’ पुढे रेटतो. पर्यावरण संवर्धनासह प्रगतीचा आलेख मांडणाऱ्यांचे आवाज क्षीण राहतात.
असाच एक जागतिक गदारोळातला क्षीण, परंतु ठाम आणि चिकाटीने कार्य करणारा, ‘युनेस्को’ने ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ म्हणून गौरवलेला, पद्मभूषण सन्मानप्राप्त असा पश्चिम घाटाच्या रक्षणाचं अव्याहत व्रत घेतलेला, स्वर निमाला प्रा. माधव गाडगीळ या सतत कार्यरत असणाऱया पर्यावरण तज्ञाने सुमारे साठ वर्षे पश्चिम घाट संवर्धनासाठी जागृती करण्याचा ध्यास घेतला होता. पृथ्वीवरचा अत्यंत महत्त्वाचा जागतिक ठेवा असलेल्या जैववैविध्याचा ऱहास रोखण्यासाठी हे उच्चविद्याविभूषित संशोधक दऱयाखोऱयात फिरले. लोकजीवनाशी समरस झाले. पर्यावरणाचे, त्यातील दुर्मिळ जैवविविधतेचे महत्त्व त्यांच्या भाषेत सांगू लागले. अनेक देशी-विदेशी परिषदा, लेख, शोधनिबंध आणि जनजागृतीची भाषणे यातून त्यांनी आपल्यासाठी पश्चिम घाट वाचवण्याची मोहीम सुरू केली. त्यांच्या प्रयत्नांचं कोरडं कौतुक अनेकांनी केलं. मात्र पश्चिम घाटातील नैसर्गिक दौलत जपणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल!































































