
>> दिव्या सौदागर
आपल्या संस्कृतीमध्ये संस्कारांना अत्यंत महत्त्व आहे. मात्र हेच संस्कार व्यक्तीसापेक्ष योग्य आहेत का? याचा विचार ते अंगीकारणाऱया व्यक्तीलाही बऱयाचदा समजत नसतं. अशा संस्कारांच्या दडपणात अडकलेल्या कित्येक व्यक्ती, विशेषत महिलांचे मानसिक स्वास्थ्य आज गंभीर होत चालले आहे.
नलिनी काकूंनी (नाव बदलले आहे) गेल्या महिन्यात वयाची साठी गाठली होती. त्यांच्या घरी त्या आणि त्यांचे यजमान सुरेश काका (नाव बदलले आहे) असे दोघेच राहत होते. दोघंही नोकरी करत होते. सुरेश काकांनी आपल्या नोकरीचा कार्यकाळ पूर्ण केला. नलिनी काकूंनी मात्र आपल्या पन्नाशीनंतर प्रकृतीच्या कुरबुरीमुळे नोकरीमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्या दोघांना एकुलता एक मुलगा होता, जो शिक्षणासाठी परदेशात गेला आणि तिथेच सेटल झाला. मुलाचं लग्न होऊन आता जवळपास दोन वर्षे झाली होती, पण हे दोघं काही त्याच्याकडे जाऊन आले नव्हते. “काय सांगू? माझा डायबिटीस, मायग्रेन आणि बीपी यामुळे मी अक्षरश कुठेही लांबच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकत नाही. नाहीतर पूर्वी नोकरीला होते तेव्हा मी खूपच अॅक्टिव्ह होते.’’ समुपदेशनाला आल्यानंतर नलिनी काकू स्वतबद्दल सांगत होत्या. त्यांच्या बरोबर त्यांची समवयस्क मैत्रीण शालिनी काकू (नाव बदलले आहे) त्यांना सोबत म्हणून आलेल्या होत्या.
“काकांना यायला नाही जमलं का?’’ असं त्यांना विचारताच काकूंच्या डोळ्यांत पटकन पाणी आलं. नलिनी काकू या त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार समुपदेशनाकरिता आल्या होत्या. त्यांच्या प्राथमिक माहितीच्या आधारावर त्यांना काय त्रास असेल, याची कल्पना आली होतीच. त्यांना समुपदेशन करणं आवश्यक होतं.
काकूंचा प्रेमविवाह होता आणि त्या वैवाहिक जीवनात सुखीही होत्या. घरची सांपत्तिक स्थितीही ‘अत्युत्तम’ या प्रकारात मोडत होती, पण काकूंच्या म्हणण्याप्रमाणे त्या दोघांत आलबेल नव्हतं, सुखसंवादच घडत नव्हता. “आमच्या नवराबायकांमधले ताणतणाव माझ्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न केला. सुरेश भरपूर रागीट आणि हेकट स्वभावाचा आहे. आमच्या तिघांमध्ये मुलासमोर आणि नातेवाईकांमध्येही खिल्ली उडवणं त्याचं चालू असायचं. देवाच्या कृपेने तो धडधाकट आहे, हेल्दी आहे आणि त्याचाच त्याला अभिमान आहे. म्हणून माझ्या छोटय़ा मोठय़ा प्रकृतीच्या कुरबुरींना त्याने कायम ‘नाटकं’ हे नाव दिलं. माझ्या मेनोपॉजमध्ये मला भरपूर मानसिक त्रास झालेला. त्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. तुझ्यामुळे आपला मुलगाही मुळुमुळु झालेला आहे. जरा शिस्त लाव त्याला.’’ असं बोलून मला खूप दुखवायचा. वाटायचं की, घटस्फोट द्यावा आणि मुलाला घेऊन दूर जावं. तेव्हा नुकतंच इंटरनेट आणि फेसबुक आलेलं. तेव्हा शालन फेसबुकवर भेटली. माझ्याच एरियात राहणारी आणि स्वतंत्र विचारांची. आमची मैत्री जमली आणि घट्ट झाली.’’ नलिनी काकू हळव्या होऊन सगळं आडपडदा न ठेवता सांगत होत्या. तेव्हा शालिनी काकूंनीही त्यांच्या संवेदनशील स्वभावाबद्दल आणि एकंदरीत नवराबायकोच्या विसंवादाबद्दल काही गोष्टी, घटना उघड केल्या, ज्यामध्ये नलिनी काकूंना मनस्ताप झाला होता. बऱयाच छोटय़ा मोठय़ा इच्छांना मुरड घालावी लागल्याने त्या नाराज राहायला लागल्या. त्यातच सुरेश काकांचे कधीही खट्टू होणे, खिल्ली उडवणे, पत्नीच्या मनाला समजू न शकणे या सर्वांचा व्हायचा तोच परिणाम काकूंवर झाला आणि त्या नैराश्यात जायला लागल्या, पण सुदैवाने शालिनी काकूंनी त्यांची ढासळती मनःस्थिती वेळीच ओळखली आणि त्यांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या.
“मी नलिनीला डिप्रेशनमध्ये जाऊच दिलं नसतं. कारण मीही त्या भयानक अनुभवातून गेलेले आहे.’’ पहिल्यांदाच शालिनी काकू व्यक्त झाल्या होत्या. त्यांनी स्वतविषयी सांगताना त्यांच्याही भूतकाळाचा थोडक्यात परामर्श करून त्यांना मानसोपचारांनी कसं बरं वाटलं तेही सांगितलं. या दोघींचा अनुभव तसा बघायला गेला तर जवळपास सारखाच होता. दोघांचेही पती दोघींना मानसिक सुख द्यायला कमी पडत होते, पण शालिनी काकूंच्या मिस्टरांना वेळीच त्यांची होणारी चूक कळली आणि ते काकूंच्या मानसोपचारांवेळी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. नलिनी काकू त्याबाबतीत एकटय़ा होत्या.
“मला एकतर कळतंय, माणूस जन्माला एकटा येतो आणि जाईपर्यंतही एकटा असतो. जर हा महत्त्वाचा प्रवास एकटय़ानेच करायचा असेल तर आहे ते आयुष्य का दुसऱयावर अवलंबून ठेवायचं?’’ असं बोलून नलिनी काकू थांबल्या. “माहीत आहे. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जिथे सगळ्या जबाबदाऱया संपल्यावर तर स्वतचा विचार करायला काय हरकत आहे? कारण आपण आपली काळजी घेतली तर इतरांवर आपलं ओझंही होणार नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जी व्यक्ती वयाच्या सत्तरीनंतरही जर हेकेखोर असेल, आत्मप्रौढी असेल तर ती बदलू शकते किंवा नाही हा त्या व्यक्तीचा प्रश्न आहे, पण म्हणून आपण आशा लावून बसणं आणि त्या व्यक्तीवर आपलं स्वास्थ्य अवलंबून ठेवणं, आपल्या छोटय़ा इच्छा आणि कर्तव्य अवलंबून ठेवणं हे योग्य आहे का?’’ असं त्यांना विचारताच काकूंनी मानेनेच नकार दर्शवला.
आपल्या संस्कृतीमध्ये संस्कारांना अत्यंत महत्त्व आहे. ‘चांगले’, ‘आदर्श’ या विशेषणांमधून ते आपल्या सगळ्यांवर बिंबवलेही गेलेले आहेत. मात्र हेच संस्कार ‘व्यक्तीसापेक्ष योग्य आहेत का याचा विचार ते अंगीकारणाऱया व्यक्तीलाही बऱयाचदा समजत नसतं. अशा इतरांना खुश करण्याच्या नादात कित्येक व्यक्ती, विशेषत महिलांचे मानसिक स्वास्थ्य आज गंभीर होत चालले आहे.
नलिनी काकूंना हे उशिरा का होईना, समजून चुकलं. नियमित सत्रांना येतानाच त्यामध्ये सांगितलेल्या काही गोष्टींवर कामही करायला लागल्या. सुरेश काकांच्या रागाला, खिल्ली उडवण्याच्या बोलण्याला दुर्लक्ष करायला शिकल्या आणि स्वतचं मन स्वतच्या छंदांमध्ये रमवायला लागल्या. शालिनी काकूंची भरभक्कम साथ त्यांना होतीच. हळूहळू त्या स्वतंत्र निर्णय घेत होत्या आणि एक दिवस सत्रामध्ये त्यांनी त्यांचा मुलाकडे परदेशी जाण्याचा निर्णय ऐकवला. सुरेश काका दुसरीकडे बहुतेक आपल्या बायकोमधला बदल टिपत होतेच. त्यांनी त्यांच्या पुरुषी अहंकाराला अनुसरून पुन्हा मुलाकडे जाण्याबाबत नापसंती दर्शवली, पण नलिनी काकू मुलाकडे जाण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्या त्या वेळी मात्र सुरेशकाका तयार झाले आणि दोघंही मुलाकडे काही महिन्यांसाठी राहायला परदेशी निघून गेले.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)