
>> पराग खोत
संयुक्त कुटुंबपद्धती आपण केव्हाच मागे सोडलीय. आता विभक्त कुटुंबपद्धतीचंही विघटन करून अधिकाधिक आत्मकेंद्रित होणं सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कौटुंबिक नात्यांची वीण घट्ट असावी, तरच आयुष्य सुखी होईल ही गरज अधोरेखित करणारं एक नवं नाटक रंगभूमीवर आलं आहे. जुन्या रूढी, परंपरा आणि आजच्या काळातील अनेक बदललेले संदर्भ यांचा सुरेख मेळ घालत, मनोरंजनाबरोबरच प्रबोधन करत, आपल्या डोळ्यांत चरचरीत अंजन घालणारं, संकर्षण कऱ्हाडे लिखित ‘कुटुंब कीर्तन’ हे ते नाटक!
पुंडलिक हा एक तरुण आणि अविवाहित कीर्तनकार. आईची काळजी आणि पांडुरंगाचा ध्यास ही त्याची दोनच व्यसनं आहेत व म्हणूनच तीस वर्षांचा झाला तरी त्याने लग्न केलं नाहीये. एकमेकांची काळजी घेत तो आणि त्याची आई सुखात आहेत. अशात त्याला एक स्थळ सांगून येतं. सोयरीक जमते आणि नवी सून घरात येते. निसर्गनियमाप्रमाणे सासू-सुनेचा संघर्ष होतो आणि कीर्तनकाराच्या या कुटुंबात घडणारं हे कीर्तन आपल्यासमोर उभं राहतं. सासू-सुनेचा संघर्ष हा विषय नवा नसला आणि टीव्ही मालिकांनी इतका चघळून तो विद्रूप करून टाकला असला तरी इथे तो केवळ तोंडी लावण्यापुरताच आहे हे नमूद करणं आवश्यक वाटतं. इथे संघर्ष आहे तो जुन्या-नव्याचा. आधुनिक जीवनशैलीने, पारंपरिक कौटुंबिक मूल्यांवर केलेलं आक्रमण आणि त्याचा चिरंतन कुटुंब व्यवस्थेने केलेला प्रतिवाद याचा सुरेख मेळ साधत नव्या-जुन्याची अचूक सांगड घालणारं हे नाटक आहे. नात्यांमधील परस्परसंबंधांचा घेतलेला उभा छेद आणि त्यातल्या चुकीच्या गोष्टी जाणवून देऊन सर्वसमावेशक आयुष्य जगण्याची दृष्टी देणारं, मूल्य आणि परंपरा जपत जगावं कसं हे दाखवून देणारं हे नाटक आहे.
कुटुंब म्हटलं की कुरबुरी आल्याच, पण त्यांना अधिक महत्त्व न देता जुळवून घेण्याची वृत्ती आपलीशी केली की जगणं सोपं होतं. नाटकाचा कथानायक पुंडलिक हा अशाच पेचात सापडलाय. आई आणि बायको या दोन्ही नात्यांचा समतोल साधताना त्याची तारांबळ होतेय, पण मूळ कीर्तनकाराचा पिंड असलेला पुंडलिक आपल्या उपजत हुशारी आणि वैचारिक सामर्थ्याने त्यातून कसा मार्ग काढतो याचा हास्यस्फोटक अवतार म्हणजे ‘कुटुंब कीर्तन’ होय. इथे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही तितकंच महत्त्वाचं आहे. किंबहुना नातेसंबंधांतील कडवटपणाला हास्यरसाचा मुलामा देत दिलेला हा डोस प्रेक्षकांना हवाहवासा वाटतो. कीर्तनाच्या माध्यमातून नातेसंबंधांसह आपल्या आहार, विहार आणि जीवनशैलीवर केलेलं भाष्य अंतर्मुख करणारं आहे व त्यासाठी लेखकाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
संकर्षण कऱ्हाडे या हरहुन्नरी कलाकाराने हे नाटक लिहिलं आहे. एक मनस्वी कवी आणि संवेदनशील अभिनेता अशी ओळख असलेला, आपल्या मातीशी नाळ घट्ट जोडून ठेवलेला आणि आपलं वैयक्तिक आयुष्य भरभरून जगणारा हा आजच्या काळातील लोकप्रिय कलावंत. मूळचा परभणीचा असलेला संकर्षण आजही आपली माय, माती आणि मूल्य यांना धरून आहे. त्याच्या कवितांतून आणि मुलाखतीतून तो अनेकदा असाच दिसतो व नेमकं हेच सगळं तो या नाटकात घेऊन आलाय. नाटकात मराठवाडय़ातील भाषेचा केलेला संयमित वापर त्याला भावनेचं एक वेगळं परिमाण देऊन जातो. ती ओल, तो जिव्हाळा त्या भाषेमुळे अधिक उठावदार होतो. प्रयोगाच्या पातळीवर खूप दमवणारं हे नाटक संकर्षणने आपल्या ऊर्जाभिनायाने सळसळतं ठेवलंय. त्याचा हजरजबाबीपणा आणि त्याने घेतलेल्या अफलातून अॅडिशन्स चपखल बसतात. कर्टन कॉलच्या वेळेला कलाकारांची ओळख करून देताना वंदना गुप्ते त्याची ओळख ‘मराठी रंगभूमीवरील हिरा’ अशी करून देतात. आजवरच्या त्याच्या प्रवासात त्याने ती ओळख सार्थ ठरवलीय. तसंच सर्वार्थाने त्याचे गुरू असलेले प्रशांत दामले यांचं कुठलाही नाटय़प्रयोग हाऊसफुल्ल करण्याचं कसब तो अंगी बाणवत चालला आहे हे त्याचं अजून एक वैशिष्टय़!
त्याला वंदना गुप्ते आणि तन्वी मुंडले यांनी भरभक्कम साथ दिलीय. वंदनाताई आईची माया आणि सासूचा तोरा सहज दाखवतात, पण काही प्रसंगांत त्यांची अंतस्थ सहृदयता नैसर्गिकपणे बाहेर येते. तन्वी मुंडलेने शिवानी ही भूमिका ठसक्यात साकारली आहे. काहीशी बंडखोर, पण तरीही तितकीच प्रेमळ असलेली ही मुलगी लक्षात राहते. ललित कला केंद्राच्या मुशीत घडलेल्या या अभिनेत्रीचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे यावर विश्वास बसू नये इतकी उजवी कामगिरी ती करून जाते. सोबत अमोल कुलकर्णी या गुणी नटाने दुहेरी भूमिकेत उत्तम अभिनय केला आहे.
विनोद रत्ना यांचं कथाबीज असलेल्या एका मूळ एकांकिकेचा विस्तार म्हणजे हे नाटक आहे. अमेय दक्षिणदास या अनुभवी आणि प्रयोगशील दिग्दर्शकाने ते विचारपूर्वक बसवलंय. अनेक प्रवेश आणि ब्लॅकआऊट असलेल्या या नाटकाचा उत्तम समतोल साधण्याचं श्रेय दिग्दर्शकाला व प्रत्येक प्रवेश एका हाय नोटवर घेऊन जाण्याचं श्रेय लेखकाला द्यायला हवं. अशोक पत्की यांचं संगीत नेहमीप्रमाणे सुरेल. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य आणि किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना नाटकाला पूरक आहे. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्सने सादर केलेल्या या नाटकाचे व्यवस्थापक आहेत अजय कासुर्डे.
विषय जुना वाटला तरी नवी ऊर्जा आणि दृष्टी देणारं आणि हसतखेळत आपल्या चुका आपल्याला दाखवून देणारं ‘कुटुंब कीर्तन’ हे नाटक आपल्या कुटुंबासहित पुनः पुन्हा पाहावं असं आहे. अवघ्या पस्तीस दिवसांत रौप्य महोत्सव साजरा करण्याचं भाग्य लाभलेल्या या नाटकाचे शंभर प्रयोग सहजच होतील, पण पाचशे-हजार प्रयोग होण्याची क्षमता असलेलं हे नाटक आहे आणि ते तसं होवोत या शुभेच्छा.