संघर्षगाथा – न्यायरागिणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्षा शुक्ल

न्यायालयात महिला वकिलांना बसण्यासाठी जागा नाकारल्याच्या निषेधार्थ आपल्या चारचाकी वाहनालाच कार्यालय करणाऱ्या वकील अनिता झा यांची ही प्रेरणादायी कहाणी बिहारच्या मधुबनी जिल्हा न्यायालयासाठीच नव्हे तर संपूर्ण देशातील न्यायव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. व्यावसायिक क्षेत्रात महिलांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल विविध पातळीवर बोलले जात असताना अनिता यांनी दाखवून दिलेला मार्ग नक्कीच अनुकरणीय आहे.

गेल्या 28 वर्षांपासून वकिली क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनिता झा यांनी पितृसत्ताक व्यवस्थेला आणि भेदभावाला झुगारून चक्क आपल्या कारलाच केबिन बनवले आहे. गेल्या 13 वर्षांपासून त्यांची टाटा टियागो कार हेच त्यांचे कार्यालय असून, न्यायालयात महिला वकिलांना बसण्यासाठी जागा नाकारल्याच्या निषेधार्थ त्यांनी हा अनोखा मार्ग निवडला आहे.

बिहारमधील मधुबनी जिल्हा न्यायालयातून एक अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. गेल्या 28 वर्षांपासून वकिली क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनिता झा यांनी पितृसत्ताक व्यवस्थेला आणि भेदभावाला झुगारून चक्क आपल्या कारलाच केबिन बनवले आहे. गेल्या 13 वर्षांपासून त्यांची टाटा टियागो कार हेच त्यांचे कार्यालय असून, न्यायालयात महिला वकिलांना बसण्यासाठी जागा नाकारल्याच्या निषेधार्थ त्यांनी हा अनोखा मार्ग निवडला आहे.

28 वर्षांचा अनुभव, पण हक्काची जागा नाही. अनिता झा यांनी 1996 मध्ये वकिलीला सुरुवात केली. मात्र, एवढय़ा मोठय़ा न्यायसंकुलात महिला वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष किंवा बसण्याची व्यवस्था नसल्याचे शल्य त्यांना नेहमीच बोचत राहिले. 2011 मध्ये त्यांनी महिला वकिलांसाठी चेंबर असावे, अशी मागणी लावून धरली होती. यासाठी त्यांनी 15 लाख रुपयांचा निधीही जमा केला होता, तरीही त्यांना जागा नाकारण्यात आली.

उलट, पुरुष सहकाऱ्यांकडून त्यांची थट्टा उडवण्यात आली आणि त्यांना मानसिक रुग्ण ठरवण्याचा प्रयत्न झाला. चेंबरवरील पाटी हटवली आणि संघर्ष पेटला अनिता झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2013 रोजी न्यायालयात महिला कक्षाचे उद्घाटन झाले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच तिथली `महिला कक्ष’ ही पाटी हटवून त्या जागेवर पुरुष वकिलांच्या नावाच्या पाटय़ा लावण्यात आल्या. जेव्हा त्यांनी याबद्दल बार असोसिएशनला विचारणा केली, तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी स्वतची खुर्ची-टेबल लावून काम करण्याचा प्रयत्न केला, पण तेही साहित्य तिथून फेकून देण्यात आले. हा सर्व प्रकार न्यायव्यवस्थेच्या केंद्रस्थानी उघडपणे घडत होता.

टाटा टियागो हे अनिता यांच्या संघर्षाचे आणि प्रतिरोधाचे प्रतीक ठरले आहे. अनेक अपमान सोसल्यानंतर अनिता झा यांनी शहर सोडून जाण्याचा विचार केला होता. मात्र, प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात गंगास्नान करताना त्यांना जाणीव झाली की, पळून जाणे हा उपाय नाही. त्यांनी मधुबनीमध्येच राहून लढण्याचा निर्णय घेतला आणि 1 मार्च 2013 पासून आपल्या कारच्या मागील सीटवरून वकिली सुरू केली.

वकील म्हणून काम करताना आपल्या कामाच्या पद्धतीत अनिता यांचा प्रामाणिकपणा, चिवटपणा विचार करायला लावतो. दररोज सकाळी 10 ते 11 वाजता त्या न्यायालयात येतात. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जलधारी चौक परिसरात उभी असलेली त्यांची कार हेच त्यांचे चेंबर असते. या कारमध्ये बसूनच त्या याचिका तयार करतात, अशिलांशी चर्चा करतात आणि कायदेशीर रणनीती आखतात. ऊन, वारा, पाऊस अशा सर्व ऋतूंमध्ये त्या कारमध्येच बसून काम करतात. त्यांच्या मते, ही कार केवळ वाहन नसून पुरुषी मानसिकतेच्या विरोधात असलेल्या त्यांच्या संघर्षाचे जिवंत प्रतीक आहे.

अनिता झा यांचा हा लढा केवळ एका चेंबरसाठी नसून, व्यावसायिक क्षेत्रात महिलांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आहे. एवढय़ा वर्षांच्या वकिलीत मला किंवा इतर कोणत्याही महिला वकिलाला हक्काची जागा मिळालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.