विज्ञान-रंजन – आकाशातला तरंगता समुद्र!

>> विनायक

सोप्या शब्दांत सांगायचं तर प्रचंड ‘ढगफुटी’ अचानक होईल एवढा वाफेच्या रूपातील आकाशी जलसाठा म्हणजे एक डोक्यावर तरंगता सागरच! 2005 मध्ये जुलै महिन्याच्या 26 तारखेला मुंबई आणि आसपासच्या जिल्हय़ांनी त्याचा भीषण अनुभव घेतला होता. जिथे कधी पाऊलभरसुद्धा पाणी साचत नाही अशा ठिकाणी घराघरांत पाणी रोरावत घुसलं. रस्त्यांना नद्यांची अवस्था प्राप्त झाली. दुमजली बसच्या वरच्या डेकपर्यंत पाणी भरलं. मुंबई बेटावर मिठी, बोयसर, पोयसर आणि कल्याण परिसरात गांधारी, वालधुनी वगैरे नद्या असल्याचा ‘साक्षात्कार’ सर्वांनाच झाला. उल्हास नदी तर कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या ‘माहेरवाशिणीसारखी घरभर नाचली!’ या अचानक जलापत्तीने काही जणांचे प्राण गेले तर अनेकांना जिवाच्या आकांताने जमेल तिथे आश्रय घ्यावा लागला. त्या आठवणी आजही थरारक वाटतात.

विश्वात जे काही नैसर्गिक उत्पात पिंवा उल्हासित करणारे ‘चमत्कार’ घडतात अशा नैसर्गिक आविष्कारांमध्ये कधी ‘रंजन’ तर कधी ‘भंजन’ असतं. कधी कुठे सप्तरंगी फुलांची बरसात होते, परिसर अकल्पितपणे गंधित होतो, मातीच्या मंद सुवासाने दरवळतो, तर काही वेळा भक्कम मुळं रुजलेली, शेकडो वर्षे घट्ट उभी ठाकलेली झाडंमाडं उन्मळून पडतात. कधी आकाशात मोहक इंद्रधनुष्य उमटतं, तर पृथ्वीवर कुठे दाहक वणवे हजारो एकरची वनश्री भस्मसात करतात.

निसर्ग हे सारं निर्हेतुकपणे करत असतो. त्यामागे त्याचा काही ‘विचार’ असतो असं सुचवणारा ‘गाइया’ हायपोथिसिस’सुद्धा आहे, परंतु या गोष्टी अकल्पितपणे सामोऱ्या येतात एवढं मात्र खरं आणि त्याहूनही हे खरं की, यामागे आपल्या लक्षात न आलेली किंवा आपण दुर्लक्षिलेली अनेक संथगतीने विक्राळ होत जाणारी कारणं असतात. बऱ्याचदा ती नैसर्गिक तर काही वेळा कृत्रिमही असल्याचं लक्षात येतं.

प्रचंड ‘ढगफुटी’मागचं कारण रंजक नसलं तरी विज्ञान समजून घेतलं तरी ‘निसर्गावर मात’ करू शकण्याच्या ‘आत्मरंजनात’ गुंगलेल्या माणूस नावाच्या प्राण्याला वेळीच जाग येऊ शकेल. हे सारं सुचण्याचं कारण, मध्यंतरी दुबईची ‘डुबई’ झाल्याची बातमी आणि आताशा मध्यपूर्वेच्या वाळवंटात कधी नव्हे ते येणारे महापूर! मुंबईची ‘तुंबई’ झाल्याच्या बातम्या तर वृत्तवाहिन्या दरवर्षी उच्चरवाने देत असतात; पण ‘सुव्यवस्थित’ मुलुखांमध्ये अवकाळी महापूर कसे येतात त्याचं उत्तर शोधण्याचं काम मात्र वैज्ञानिक करत असतात. ‘सिस्टीम’ उत्तम असून असं कसं हो झालं? त्याचं उत्तर विज्ञानात सापडतं. ते पृथ्वीवरच्या वार्षिक जलचक्राशी निगडित असतंच, पण त्यात हस्तक्षेप करून केलेल्या कृत्रिम पावसाशीही निगडित असतं का? याचा विचार आता संपन्न देश गंभीरपणे करू लागलेत. नव्हे, तशी वेळच त्यांच्यावर आली आहे. उत्तमरीत्या वसलेल्या मोहेंजोदारो, डोळावीरासारख्या महानगरांची बघता बघता झालेली ऐतिहासिक काळातील हानी नैसर्गिक प्रकोपातून झाली असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सतत गप्पा मारणाऱ्या माणसाने सावध व्हायला हवं. ‘जेन झी’ (पुढची पिढी) हे मोठंच आव्हान असणार आहे.

पाऊस रिमझिम, जोरात किंवा ‘धो धो’ असला तर अनुभवता येतो, पण तो धबधब्यासारखा कोसळला तर काय करायचं? एका चौरस किलोमीटरवर 25 मिलिमीटर पाऊस पडला तर 25 हजार मेट्रिक टन एवढं पाणी पडतं. हा अचानक धबाबा कोसळतो ती ‘ढगफुटी.’ गरम हवेचे झोत वरच्या थरातील थंड हवेशी अचानक टक्करतात तेव्हा त्यात समुद्री वाफेचं प्रमाण प्रचंड असेल तर त्याचा एकगठ्ठा ‘स्तंभ’ तयार होतो. त्यामुळे तासाभरात 100 मिलिमीटर (10 सें.मी.) पाऊस पडला तरी तो ‘क्लाऊडबर्स्ट’ किंवा ढगफुटी असते. आता मिनिटाभरातच दोन सेंटिमीटर पाऊस कोसळला तर पूर येणारच आणि तोही अचानक. अशा वेळी आकाशात वाफेद्वारे साठवलेल्या पाण्याचा एक मोठा महासागरच तरंगत असतो. अशा महामेघावर ‘कृत्रिम पावसा’चा प्रयोग करण्यासाठी सिल्व्हर आयोडाइट, सुका बर्फ आणि मीठ शिंपडलं तर त्या वाफेचं वेगात पाण्यात रूपांतर होऊन ते बदाबदा खाली कोसळतं. दुबईत तसंच घडलं असं म्हटलं जातं.

परंतु असं पावसाळी प्रदेशात नैसर्गिकरीत्याही घडतं. जास्त उन्हाळा, ‘एल निनो’ परिणाम वगैरेमुळे सागरी पाण्याची प्रचंड वाफ होऊन वातावरणाच्या वरच्या थरात साठून राहते. त्याचं एकत्र ‘कन्डेन्सेशन’ झालं तर थंडावा लाभला की, पाण्यात रूपांतर झालेली वाफ गुरुत्वाकर्षणाने कोसळते. त्याची 1970 पासूनची जागतिक नोंद सांगते की, मिनिटाला  4 सेंटिमीटर ते ताशी 15 सेंटिमीटर पाऊस पडू शकतो. त्यात आपला 26 जुलै 2005 चा रेकॉर्ड सर्वाधिक आहे. त्यावेळी उल्हासनगर – बदलापूरवर रेंगाळणारा महामेघ ताशी बारा सेंटिमीटर या तुफानी वेगाने सतत दहा तास कोसळत राहिला आणि भरतीच्या वेळी समुद्रानेही पाणी सामावण्यास ‘नकार’ दिल्यावर सारा परिसर जलमय झाला.

बदलत्या हवामानात गारपीट, ढगफुटी, तुफानी पाऊस अथवा दुष्काळ यांचं प्रमाण वाढेल अशी धास्ती आहे. त्यासाठी जल आणि पीक नियोजनाचा कार्यक्रम जागतिक पातळीवर तातडीने हाती घ्यायला हवा. कारण जगायला अन्नपाणी मिळालं तरच पुढची प्रगती घडवता येईल.