नवा ट्रेंड! लग्न सोहळ्यात एआयची एण्ट्री!! मेहंदी, संगीत, पाहुणे… फोटोग्राफी अधिक स्मार्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नघर म्हटले की धावपळ, गोंधळ हा ठरलेला. अशा वेळी लग्नाचे सगळे व्यवस्थापन एआयच्या मदतीने एकदम सोपे केले जात आहे. तसा नवीन ट्रेंड हळूहळू पसरत आहे. मेहंदी डिझाईनपासून गेस्ट लिस्ट, फोटोग्राफी, खाण्यापिण्याचे प्लॅनिंग यामध्ये एआयचा समावेश करून लग्न सोहळा पहिल्यापेक्षा अधिक स्मार्ट केला जात आहे. अर्थात यात ‘डीपफेक’सारखी जोखीम आहेच. लग्न सोहळ्यातील मानवी स्पर्श हरवण्याची भीतीही व्यक्त होत आहे

स्टाईल बॉट्सची फॅशन

लग्न सोहळ्यासाठी कपडे कोणते निवडावे, हा मोठा प्रश्न वधू-वरांच्या म्हणजे दोन्ही बाजूच्या लोकांना पडतो. व्हर्च्युअल ट्राय ऑन, पर्सनलाइज्ड रिपंमडेशन आणि ट्रेंड प्रेडिक्शन यासारखी सुविधा मोबाईलवर उपलब्ध आहे. वधू-वर किंवा त्यांचे नातेवाईक कोणतीही ट्रायल न घेता लग्नाच्या पेहरावाचा निर्णय घेत आहेत. एआय जनरेटेड ज्वेलरी व्हिज्युअलाईज्ड शेअर करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. कारण महागडय़ा दागिन्यांची माहिती लीक होऊ शकते.

एआय फोटोग्राफरची मदत

लग्नात शेकडो फोटो काढले जातात. त्यातील निवडक फोटो वेगळे करावे लागतात. एआयच्या मदतीने फोटो क्युरेशन, ऑटो एडिटिंग, हायलाईट व्हिडीयो बनवता येतात. खराब फोटो हटवून बेस्ट शॉट्स निवडता येतात. मात्र हे करताना डिजिटल व्हेरिफिकेशनवर लक्ष दिले पाहिजे.

खाण्यापिण्याची व्यवस्था

एआय आता कॅटरिंग आणि गेस्ट मॅनेजमेंटमध्येही मोठी भूमिका पार पाडत आहे. अल्गोरिदम गेस्ट प्रेफरन्सचा अंदाज घेऊन मेन्यू ठरवणे आणि फूट वेस्ट कमी करण्याचे काम करत आहे. सीटिंग अरेंजमेंट आणि ट्रॅकिंगदेखील ऑटोमेटेड होत आहे. त्यामुळे मॅरेज प्लॅनरचे काम सहजसोपे होऊन गेलंय.

निमंत्रण पत्रिका आणि संगीत

लग्नाच्या कागदी निमंत्रण पत्रिकांऐवजी आता एआय डिझाईन डिजिटल इनवाईट लोकप्रिय होऊ लागले आहेत. प्रत्येक गेस्टला पर्सनलाईज्ड मेसेज दिला जात आहे. संगीत आणि रेसेप्शनसाठी एआय प्लेलिस्ट क्युरेट करून उपस्थितांच्या मूडच्या हिशेबाने गाणी सजवली जात आहेत.

अल्गोरिदमवाला मेहंदी सोहळा

मेहंदी सोहळा हा जास्त वेळखाऊ असतो. पण एआयच्या मदतीने मेहंदी सोहळ्यामध्ये आता नवा ट्विस्ट आला आहे. स्मार्ट टुलच्या मदतीने पोशाखाचा रंग, हाताचा आकार आणि सोशल मीडिया ट्रेंडच्या हिशेबाने डिझाईन सुचवले जात आहेत. असे असले तरी शेवटचा हात मेहंदी कलाकारच चांगला देऊ शकतात.