बीसीसीआयमध्ये घराणेशाही, अमित शहा यांच्यानंतर अरुण जेटलींच्या पुत्राची बीसीसीआयच्या सचिवपदी वर्णीची शक्यता

कोणतीही गुणवत्ता नसताना गृहमंत्री अमित शहा यांचा पुत्र म्हणून जय शहा यांनी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयच्या सचिवपदाची खुर्ची बळकावल्यानंतर आता जय यांच्या जागी भाजपचेच दिवंगत नेते अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांची वर्णी लागणार असल्याचे संकेत मिळालेत. त्यामुळे राजकारणापाठोपाठ बीसीसीआयमध्येही घराणेशाही दिसू लागली आहे.

आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले आपला अर्ज भरणार नसल्यामुळे बीसीसीआय सचिव जय शहा हे अध्यक्षपदी जाणार असल्याचे निश्चित झालेय. त्यांची निवडही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास त्यांनी बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागेल. अशा स्थितीत त्यांच्या जागी अरुण जेटली यांचे पुत्र आणि दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राजकारणाप्रमाणे बीसीसीआयमध्येही घराणेशाही मोठ्या प्रमाणात उफाळून आल्याचे चित्र उभे राहिले आहे.

शहानंतर रोहन जेटली यांच्या नावावरही जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. हळूहळू भाजपने देशातील सर्व खेळांच्या जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय संघटनांना आपल्या ताब्यात घेतले असून असंख्य संघटनांवर भाजपचेच नेते किंवा त्यांची मुले विराजमान आहेत. बीसीसीआयने ती परंपरा कायम ठेवली आहे. जेटली यांच्यावर भाजपचा हात असल्यामुळे त्यांच्या नावाला कुणीही विरोध दर्शवलेला नाही.

फक्त 9 मतांची गरज

हिंदुस्थानच्या अनेक संघटकांनी आतापर्यंत आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे. यात जय शहा हे सर्वात तरुण अध्यक्ष असतील. अध्यक्षपदासाठी शहा यांना 15 ते 16 जणांचा पाठिंबा आहे आणि या निवडणुकीत 16 मते आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी विजेत्याला केवळ 9 मतांची गरज असते. याआधी अध्यक्ष होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागायचे, मात्र घटनेत बदल केल्यानंतर बहुमतासाठी 51 टक्के मते निश्चित करण्यात आली. त्यामुळे जय शहा हे अध्यक्षपदी सहज जिंकून येतील, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला आहे.