ते जिंकू शकत नाही, त्यामुळे ते मतचोरी करतात; अरविंद केजरीवाल यांचे भाजपवर टीकास्त्र

निवडणूक आयोग आणि भाजप या सत्ताधारी पक्षावर निवडणुकांतील मत चोरीचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. यासंदर्भात अनेक पुरावे सादर करत त्यांनी सरकारची पोलखोलच केली. यानंतर देशभरात ‘मत चोरी’च्या मुद्द्यावरून राजकारण तीव्र झाले आहे. ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावर भाजपवर हल्लाबोल केला आहे. सर्व विरोधी पक्षांनी योग्य मुद्दा उपस्थित केला आहे असा आरोप त्यांनी केला.

गुजरातमधील राजकोट येथील दौऱ्यादरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “मत चोरी करणे हे अत्यंत चुकीचे आहे. सर्व पक्षांकडून योग्य मुद्दा उपस्थित केला जात आहे. भाजपला आता असे वाटू लागले आहे की ते जिंकू शकत नाहीत, त्यामुळे ते मते चोरून जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल यावेळी केजरीवाल यांनी केला.

आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि निवडणूक आयोगावर निवडणूक प्रक्रियेत हेराफेरीचा आरोप केला होता आणि त्यावेळी काँग्रेसवरही टीका केली. आपच्या प्रवक्त्या प्रियांका कक्कर म्हणाल्या होत्या की, भाजप आणि निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या ‘मतचोरीच्या’ मागे काँग्रेसने मौन बाळगणे अयोग्य असल्याचे त्या म्हणाल्या.