गुजरातमध्ये ‘आप’ कार्यकर्त्यांच्या अटकेचे सत्र; अरविंद केजरीवाल आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या पोलीस कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या अटकेच्या सत्रावर तीव्र आक्षेप नोंदवला असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. गेल्या तीन महिन्यांत पक्षाच्या १६० हून अधिक कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

मुख्यमंत्री पटेल यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल यांनी गुजरात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, आगामी पंचायत आणि नगरपालिका निवडणुकांपूर्वी पक्षाचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात आहे. गुजरातमध्ये सध्या अटकेचा एक विशिष्ट पॅटर्न राबवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये काही अज्ञात लोक रस्त्यावर आप कार्यकर्त्यांच्या वाहनांना धडक देतात, त्यांच्याशी वाद घालून मारहाण करतात आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचून पीडित कार्यकर्त्यांवरच हत्येचा प्रयत्न (कलम ३०७) यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करतात.

केजरीवाल यांनी पत्रात खंभालिया, पोरबंदर आणि जामनगरमधील घटनांचा दाखला देत पोलिसांवर एकतर्फी कारवाई केल्याचा ठपका ठेवला आहे. “गुजरातमध्ये गेल्या ३० वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, मात्र आता जनता भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. आपची वाढती लोकप्रियता पाहून घाबरलेल्या सरकारने आता १० हजार कार्यकर्त्यांना अटक करण्याचा कट रचला आहे,” असा दावाही त्यांनी केला.