लालबाग येथील मराठी फेरीवाल्यांवर पालिका आणि पोलिसांनी अन्यायकारकपणे कारवाई करण्यात येत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. याचा तीव्र निषेध करीत आज फेरीवाल्यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. लालबाग फेरीवाला विक्रेता संघाकडून सुरू असलेल्या या आंदोलनाला शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. ‘लाडका भाऊ, पण काय खाऊ?’, असा सवाल यावेळी अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.
लालबागमधील हे मराठी फेरीवाले भरउन्हात तर कधी भरपावसात दिवसरात्र कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र या मराठी फेरीवाल्यांवर गेल्या काही दिवसांपासून पालिका आणि पोलीस कारवाई करीत आहेत. याचा निषेध म्हणून ‘लालबाग फेरीवाला विक्रेता संघ’कडून साखळी उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनाला शिवसेनेकडून पाठिंबा देत शिवसेना तुमच्या पाठीशी ठाम असल्याचे आश्वासन अरविंद सावंत यांनी दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, मध्यंतरी महानगरपालिका निवडणूक येणार असा सुगावा लागल्यावर याच फेरीवाल्यांना दहा हजारांचे कर्जरूपी अनुदान देऊन भुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच राज्य सरकारने याच फेरीवाल्यांना 30 हजार रुपये कर्ज दिले. मात्र आता जर याच फेरीवाल्यांची रोजीरोटी हिरावून घेतली तर ते कर्जफेड कशी करणार? असा सवालही त्यांनी केला.
आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
संकटाचा सामना करण्यासाठी फेरीवाल्यांची एकजूट महत्त्वाची असून शिवसेना फेरीवाल्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे आश्वासन यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी दिले. क्षणिक मोहाला बळी जाऊन विकले जाणार नाही अशी शपथ घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार अजय चौधरी, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, समीक्षा परळकर, शाखाप्रमुख किरण तावडे, महिला शाखा संघटक कांचन घाणेकर, गौरी चौधरी यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.