विसर्जनाला गालबोट, आसनगावच्या भारंगी नदीत पाच तरुण बुडाले; दोघांचा मृत्यू

शहापूरच्या भारंगी नदीत पाच गणेशभक्त बुडाल्याची घटना समोर आले आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघांना वाचवण्यात यश आले असून एकाचा शोध सुरू आहे. वाचवलेल्या गणेशभक्तांना उपचारासाठी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी घटनास्थळी एनडीआरएफ पथक दाखल झाले असून शहापूर पोलिसांसह जीवरक्षक टीमच्या मदतीने वाहून गेलेल्या एका तरुणाचा शोध घेतला जात आहे.

मृत प्रतीक मुंडे व दत्तू लोटे आसनगाव येथील शिवतेज मित्र मंडळाच्या गणपतीचे शुक्रवारी सायंकाळी विसर्जन सुरू होते. त्यावेळी दत्ता लोटे या तरुणाने पोहण्यासाठी नदीत उडी मारली. मात्र तो वाहू लागल्याने मंडळाच्या पाच तरुणांनी त्याला वाचवण्यासाठी एकापाठोपाठ एक नदीत उड्या मारल्या. परंतु तेदेखील नदीत वाहून गेले. यातील प्रतीक मुंडे व दत्तू लोटे यांचे मृतदेह रात्री उशिरा हाती लागले असून रामनाथ घारे व भगवान वाघ यांना वाचवण्यात यश आले आहे. यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कुलदीप जाखेरे या तरुणाचा एनडीआरएफ पथक, जीवरक्षक टीम व शिवतेज मित्र मंडळातील तरुणांकडून शोध सुरू आहे.

खाडीत बुडणाऱ्या तिघांना वाचवले
वसई : विरारच्या मारंबळपाडा जेट्टी येथे शनिवारी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांना वैतरणा खाडीतून वाचवण्यात यश आले आहे. रो-रो फेरीबोटीवरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिघे जण थोडक्यात बचावले आहेत. विरार पश्चिमेच्या मारंबळपाडा जेट्टी येथील वैतरणा खाडीत वसई- विरार पालिकेकडून गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.

विजेच्या धक्क्याने भाविकाचा मृत्यू
भाईंदर अनंत चतुर्दशीनिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा उघड्या तारेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रतीक शहा (३४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या साथीदारांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला मात्र ते विजेच्या धक्क्याने लांब फेकले गेले व थोडक्यात बचावले.