>> आशा कबरे-मटाले
जागतिकीकरण व तंत्रज्ञान यांच्या रेटय़ामुळे आपली आजची तरुण पिढी मग ती इंग्रजी भाषेत शिक्षण घेणारी असो वा देशी भाषांमध्ये, त्यांच्या आचारविचारांत, पोशाख आणि जीवनशैलीवर पाश्चिमात्य संस्कृतीचा मोठा पगडा दिसतो. पण असं असूनही हिंदुस्थानी सण आणि उत्सव साजरे करताना मात्र या तरुण पिढीचा उत्साह पण तितकाच उधाणताना दिसतो.
अनेक बाबतीत आपली आजची तरुण पिढी आधीच्या पिढय़ांपेक्षा वेगळी आहे. त्यांचं वागणं, विचार करण्याची पद्धत, त्यांची नीतिमूल्ये काहीशी वेगळी असल्याचं जाणवतं. अर्थातच ते एका वेगळ्या कालखंडात वाढताहेत. जागतिकीकरणासोबतच तंत्रज्ञानाचा मानवी जीवनातील वाढता शिरकाव तरुण पिढीच्या एकंदर मानसिकतेला व सामाजिक व्यवहारांना प्रभावित करताना दिसतो. आधीच्या पिढय़ांपेक्षा शिक्षण आणि करीअरच्या संदर्भात ही पिढी अधिक अटीतटीच्या स्पर्धेला व ताणांना तोंड देताना दिसते. प्रत्यक्ष जगातील सामाजिक संबंधांइतकाच किंवा त्याहून किंचित अधिकच वेळ ही पिढी ‘ऑनलाइन’ जगण्यात व समाजमाध्यमांवर घालवते. पण हे सारं असं असलं तरी जेव्हा जेव्हा आपले सणा-उत्सवांचे दिवस येतात, तेव्हा ही तरुण पिढीदेखील जुन्या पिढीइतक्याच उत्साहाने व आनंदाने हे सण साजरे करण्यात सहभागी होताना दिसते. विशेषतः सामाजिक सहभागाच्या सर्व सणांच्या बाबतीत तरुण पिढीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. होळी, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी या सर्व प्रमुख हिंदुस्थानी सणांच्या वेळी हे निश्चितपणे जाणवतं.
एरवी इंग्रजी भाषेत शिक्षण घेणारे तरुण-तरुणी असोत वा देशी भाषांमध्ये शिकणारे आचार-विचारात, पोशाख आणि जीवनशैलीत त्यांच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा कमी-अधिक पगडा दिसत असला तरी हिंदुस्थानी सण-उत्सव साजरे करताना मात्र ही पिढी अगदी सहजपणे आणि आनंद-उत्साहाने आपल्या सांस्कृतिक चालीरीती, पोशाख यांचा स्वीकार करताना दिसते. हिंदुस्थानी पोषाखांना त्यांच्या दैनंदिन जीवनात फारसं स्थान नसलं तरी सणासुदीला पारंपरिक वेश परिधान करण्याबाबत बहुतांश तरुण-तरुणी उत्साही असतात. नवरात्रीसारख्या सणाच्या वेळी तर गुजराती नसलेल्या सर्व भाषिक तरुणींना गुजराती चनिया-चोली किंवा तत्सम खास गरबा-दांडियासाठीचा पोशाख परिधान करायचा असतो. काही तरुणांनाही त्याची आवड असते. असे सर्व प्रकारचे समारंभी व खास सणासुदीचे पोशाख आता भाडय़ानेही उपलब्ध असल्याने तरुणांना आपली हौस भागवता येते. अर्थात, तरुण-तरुणींचा सणांमधील सहभाग प्राधान्याने अशा नटण्या-सजण्यात असला तरी तेवढय़ापुरताच मर्यादित मात्र नसतो. संख्या कमी असेल कदाचित, पण सणांना बनवले जाणारे विशिष्ट हिंदुस्थानी पदार्थ, पक्वान्नं शिकून घेऊन ती बनवण्यातही ही पिढी रुची घेताना दिसते. मग ते मोदक असोत, पुरणपोळी वा दिवाळीचा फराळ. गणपतीची सजावट, दिवाळीतला कंदील वा रांगोळी या साऱयातही तरुण पिढी उत्साहाने सहभागी होते. शिक्षण-नोकरीच्या ताणामुळे अशा तरुण-तरुणींची संख्या कमी असेल, पण असा सहभाग आजही दिसतो ही नक्कीच आनंदाची बाब आहे.
सणांशी संबंधित परंपरांचा वारसा आजही अगदी सहजपणे पुढच्या पिढीकडे सुपूर्द होताना दिसतो. काळाच्या ओघात बरेच सामाजिक बदल घडत असले तरी या परंपरा खंडित होण्याची चिंता करण्याची गरज दिसत नाही. बहुतेक सारेच हिंदुस्थानी सण कृषिप्रधान संस्कृतीचा भाग आहेत. इथल्या विशिष्ट निसर्गचक्राशीही त्यांचा संबंध दिसतो. हे सारं मात्र तरुण पिढीनं समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडच्या निरनिराळ्या राज्यांमधील सणांच्या छोटय़ा-छोटय़ा चालीरितींचा त्यामुळेच शेतकरी जीवनाशी संबंध दिसतो. यातील काही प्रथा काळाच्या ओघात, शहरी जीवनपद्धतीत काहीशा मागेही पडत आल्या आहेत. असं तर व्हायचंच. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर घटस्थापना व मातीत विविध बियाणी पेरून केली जाणारी उगवण याविषयी बोलता येईल.
शेतीच्या दृष्टीने या घटस्थापनेला महत्त्व असलं तरी आजच्या शहरी जीवनाच्या धबडग्यात अनेकांना अशा काही चालीरीतींचं नियमित पालन करणं जमत नाही. मग हळूहळू त्या मागे पडताना दिसतात, पण एकंदर सोहळा साजरा करण्याची मुख्य परंपरा खंडित होण्याची मात्र भीती बाळगण्याची अजिबातच गरज नाही. आपली आजची तरुण पिढी ही आधीच्या पिढय़ांइतकीच उत्सवप्रेमी आहे हे निश्चित. त्यामुळे हिंदुस्थानी सण व संबंधित परंपरांविषयीची आत्मीयता व ओढ हे आजचे तरुण-तरुणी जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी टिकून राहतानाही दिसते. किंबहुना हे सण व ते साजरे करणं हा त्यांना आपल्या मायदेशाशी जोडून ठेवणारा मोठा दुवा वाटतो. त्यामुळे परदेशस्थ हिंदुस्थानी आपल्या सणांच्या परंपरा व चालीरीती पाळण्याच्या बाबतीत काहीसे अधिकच दक्ष दिसतात. म्हणूनच मग अमेरिकेत विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाकरिता टाळ- चिपळ्यांसह निघालेली पायी वारी दिसते, ऑस्ट्रेलियात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो, तसंच युरोप व अमेरिकेत जिथे-जिथे गुजराती, बंगाली मंडळी असतील तिथे-तिथे गरबा, दांडिया आणि दुर्गापूजा साजरी होताना दिसते. दिवाळी तर सारेच हिंदुस्थानी जिथे कुठे असतील तिथे धुमधडाक्यात साजरी करतात. इथल्या भाषा-प्रांतांच्या सीमारेषा परदेशात गेल्यावर काहीशा पुसट होतात व सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन हे सण साजरे करतात. अर्थात हिंदुस्थानी तरुण पिढीची उत्सवप्रियता त्यांना परदेशातच नव्हे तर आता काही प्रमाणात इथे देशातही ‘थँक्स गिव्हिंग’ व ‘हॅलोवीन’सारखे विदेशी सणही साजरे करायला उद्युक्त करते. सेलिब्रेशनमध्ये रमणाऱया या तरुण पिढीचा उत्साह विदेशी सणांच्या वेळी तसंच व्हॅलेंटाइन डेसारखे निरनिराळे दिवस साजरे करतानाही उधाण असतोच. यातलं व्यापारीकरण वगळलं तर त्यात गैरही काही नाही. सणांचा मूळ हेतू दैनंदिन जीवनाच्या धबडग्यात थोडं थांबून आनंदाचे चार क्षण निर्माण करणं हाच असतो. नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यासोबत सण साजरा केल्याच्या आठवणी पुढे आयुष्यभर आनंद देतात. त्यामुळे ते साजरे करायलाच हवेत. आजच्या तणावयुक्त जीवनात तर त्यांची गरज अधिकच आहे.
देशात आणि विदेशात तर स्वाभाविकपणे अधिक प्रमाणात तरुण पिढी ईद व ख्रिसमससारखे अन्य धर्मियांचे सणही साजरे करताना दिसते. सण जसे आपली परंपरा व ओळख जपण्यात मदत करतात, तसंच इतरांचे सण साजरे करण्यात सहभाग घेतल्यास भिन्न समाजांमधील अंतरही कमी होतं. हा दुरावा कमी होण्याची आज अवघ्या जगालाच गरज आहे.