‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने  अवघी पंढरी दुमदुमली; चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची मांदियाळी, वीस लाखांहून अधिक वारकऱ्यांची हजेरी

>>  सुनील उंबरे

हीच माझी आस।

जन्मोजन्मी तुझा दास।।

पंढरीचा वारकरी।

वारी चुको नेदी हरी।।

अशी आस मनोमन बाळगून आलेल्या वीस लाखांहून अधिक वारकऩयांनी चंद्रभागेचे मंगल स्नान, श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिराची नगरप्रदक्षिणा अन् मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आपली वारी पूर्ण केली. तत्पूर्वी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पत्नी अमृता यांनी श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. यावेळी वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या पूजेत सहभागी होण्याचा मान नाशिक जिह्यातील भाविक कैलास व त्यांच्या पत्नी कल्पना उगले (जातेगाव, ता. नांदगाव) या दांपत्याला मिळाला.

यंदा वरुणराजाने बहुतांश महाराष्ट्रामध्ये वेळेआधीच हजेरी लावल्याने शेत़कऱ्यांत समाधानाचे वातावरण होते. शेतकरी आपल्या शेतीच्या मशागती उरकून वारीच्या या सोहळ्यात मोठय़ा संख्येने सहभागी झाला असल्याचे दिसून आले.

आषाढीच्या सोहळ्यासाठी दाखल झालेल्या वारकऱ्यांनी भल्यापहाटेपासून चंद्रभागा नदीच्या स्नानासाठी मोठी गर्दी केली. ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा नामघोष करीत चंद्रभागेच्या खळखळत्या पाण्यात डुबक्या मारल्या…

चंद्रभागेचे स्नान करून बहुतांश वारकरी नगरप्रदक्षिणा घेण्यासाठी दिंडीत सहभागी झाले तर काहींनी श्री विठ्ठल- रखुमाईच्या पदस्पर्श अन् मुखदर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेचा रस्ता धरला.श्री विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे अशी आस मनी बाळगून आलेल्या भाविक दर्शन रांगेत गर्दी करीत होते. देवाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग आठ किलोमीटर दूर गेली. पददर्शनासाठी वीस तासांहून अधिक वेळ लागत होता.

बळीराजाला सुखीसमाधानी ठेव

 पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी कैलास दामू उगले, कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली.

विठुरायाचा रथ

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठुरायाचा रथ काढला जातो. या रथावर खारीक व खोबरे उधळले जाते. असंख्य भाविकांना थेटपणे विठुरायाचे दर्शन होत नाही. त्यांना दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष देवच रथयात्रेच्या माध्यमातून दर्शन देतात, अशी भाविकांची धारणा असते. या रथालाही भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

वाहतुकीत बदल

वारीच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने वाहतुकीत मोठे बदल केले काही ठिकाणी एकेरी वाहतूक केली. या बदलामुळे भाविकांना गर्दीचा फारसा त्रास झाला नाही. होमगार्ड, स्वयंसेवक आदी यंत्रणा वारकऱ्यांना सुलभ वाहतूक करुन देण्यासाठी डोळय़ात तेल घालून काम करीत होते.