आषाढी एकादशीला शेगावात भक्तांची मांदियाळी; लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

आषाढीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाऊ न शकलेले हजारो वारकरी, भाविकांची मांदीयाळी आज विदर्भातील पंढरी संत नगरीत दाखल झाली. जवळपास एक लाख भाविकानी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले तर दुपारी दोन वाजता श्रींची पालखी नगरपरिक्रमा करीता निघाली होती.
गुरुवारी सायंकाळ पासून विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील हजारो भाविकानी श्रीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. श्रीचे संमाधी मदिर दर्शनासाठी २४ तास सुरू होते तर आज शुक्रवार रोजी पहाटे पासून भाविक भक्त आपल्या वाहनाने शेगांव येथे येऊन श्रींचे दर्शन घेत होते.

शेगांव शहरात सेवाभावी संस्था कडून भाविक भक्त यांना चहा, फराळ पाणी वितरीत करण्यात आले. आज दुपारी २ वाजता जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम, गजानना अवलीया अवतरले जग ताराया, विठोबा नामाचा जयघोष करीत श्रींच्या पालखीचे पुजन संस्थानचे अध्यक्ष नारायणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थानचे विश्वस्त डॉ. रमेश डांगरा, शरद शिंदे, पंकज शितूत, विश्वेशर त्रिकाळ, अशोक देशमुख, गोविंद कलोरे हजर होते. श्रींच्या पालखीचे पुजना नंतर श्रींची पालखी, अशव, गज, रथ, मेणा, सह नगर परिक्रमा करीत निघाली. श्री दत्त मदिर, श्री हरहर महादेव मदिर, श्री शितलनाथ महाराज मदिर, श्रींचे प्रगटस्थळ, आठवडी बाजार, बसस्थानक, शिवाजी चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मदिर परिसर व सायंकाळी पोहोचले व सायंकाळी श्री विठोबाची व श्री गजानन महाराज याची आरती झाली. आषाढी एकादशी निमित्ताने सायंकाळी कीर्तन झाले. श्रींच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांना शहरातील नगर परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी पाणी शिंपडून विविध असे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तर भाविकांनी श्री च्या दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी केली होती.

श्री क्षेत्र पंढरपूर शाखा येथे सुध्दा वारी निमित्त आलेल्या सर्व वारकर्‍यांना दशमी, एकादशी व बारस असे तीन दिवस महाप्रसाद वितरण चालू आहे. तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, राज्यातील आलेल्या वारकरी भाविकांना व भजनी दिंड्यांना संस्थानच्या नियमाची पूर्तता केलेल्या ११२ भजनी दिंड्यांना भजनी साहित्य दहा टाळ, एक विना, एक मृदंग व ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराज गाथा व श्री एकनाथ भागवत या संत साहित्याचे वितरण करण्यात आले. आज पर्यंत शेगाव व सर्व शाखेमधून एकूण १८ हजार ५०० च्या वर भजनी साहित्य वितरित करण्यात आले. आषाढी एकादशी महोत्सवात साजरा करण्यात येतो संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार सेवाधारी आपली सेवा देत आहे.

टाळ मृदंग आणि वीणेचा मंगलमय सुरेल आवाजातील अभंग आणि मोठ्या श्रद्धेने सुरू असलेला ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’, ‘गजानन महाराज’ असा जयघोष सर्वत्र ऐकू येत आहे. शेगाव शहरात आज आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केळी, पेंडखजूर या पदार्थांची मागणी वाढली होती. आज आषाढी एकादशीनिमित्त प्रत्येक भाविकाला एकादशीचा उपवास असल्याने शहरात केळी, पेंडखजूर, चिकू, राजगिर्‍याचे लाडू याची मागणी वाढली होती. केळी वीस ते पंचवीस रुपये डझन विक्री केली जात होती. भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद! अशी वारकर्‍यांची स्थिती होती. श्री संत गजानन महाराजांनी बापुना काळे यांना आषाढी एकादशीला कुकाजी पाटीलांच्या वाड्यात पंढरपूर येथे विठ्ठल रूपात दर्शन दिले होते. त्यामुळे जे भाविक पंढरीला जाऊ शकले नाही असे भाविक पायी वारी करीत शेगांव येथे येऊन श्री गजानन महाराज चरणी नतमस्तक होऊन पांडुरंगाच्या दर्शनाची आस पूर्ण करतात.

आपली प्रतिक्रिया द्या