> आशिष बनसोडे
वन्य प्राणी असो अथवा समुद्री वन्य जीव, यांना परदेशातून मोठय़ा प्रमाणात मागणी असते. त्यामुळे त्यांची छुप्प्या पद्धतीने तस्करी केली जाते. अशा काही तस्करांना वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो कस्टम विभागाच्या मदतीने रोखण्याचे काम तितक्याच ताकदीने केले जाते, पण असे असले तरी या यंत्रणेचे हात आणखी बळकट करण्याची आवश्यकता आहे.
गँगवारचा जमाना गेला, जवळपास इतिहासजमा झाला. कलियुग हे आधुनिकतेचे असल्याने त्यानुसार गुह्यांचे स्वरूपदेखील बदलले. खंडणी, दरोडे, हत्या यांची जागा आता अंमली पदार्थ व सायबर गुह्यांनी घेतली. रक्ताचा थेंबही न सांडता ऑनलाईन पद्धतीने व ड्रग्जच्या माध्यमातून लाखो रुपये सहज गुन्हेगार कमवत आहेत. या गुह्यांनी डोकेदुखी वाढवली असतानाच दुसऱया बाजूला वन्य प्राणी, समुद्री वन्य जिवांची गुपचूप तस्करीदेखील सुरूच आहे. दक्षिण आशियाई देशांत समुद्री वन्य जिवांना असलेल्या मागणीनुसार तस्कर त्या संधीचे सोने करण्याचा आटोकाट प्रयत्न करताहेत. पण अशा काही तस्करांना वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो कस्टम विभागाच्या मदतीने रोखण्याचे कामदेखील तितक्याच ताकदीने करीत असतात, पण असे असले तरी या यंत्रणेचे हात आणखी बळकट करण्याची आवश्यकता आहे.
वन्य प्राणी असो अथवा समुद्री वन्य जीव, यांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. कारणे वेगवेगळी असली तरी परदेशातून यांना प्रचंड मागणी होत असते. त्या देशातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यासाठी मग तस्करदेखील मागे-पुढे पाहत नाहीत. कारण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन कायद्यानुसार बऱयाच महत्त्वाच्या समुद्री वन्य जिवांच्या तस्करीवर हिंदुस्थानात बंदी आहे. तरीदेखील तस्कर झटपट मालामाल होण्यासाठी या वन्य जिवांची अगदी छुप्प्या पद्धतीने तस्करी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. बऱयाचदा ते यशस्वीदेखील होतात, पण पश्चिम विभाग मुंबईच्या वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या पथकांनी अशा वन्य जिवांची तस्करी करणाऱयांचे अलीकडच्या काळात कंबरडे मोडले आहे.
परदेशामध्ये विशेष करून दक्षिण आशियाई देशांमध्ये जसे की, थायलंड व मलेशिया आदी देशांतील खवय्यांकडून समुद्री वन्य जिवांना विशेष मागणी असते. सी हॉर्स, पाईप फिश, शार्क माशांचे पंख यांना दक्षिण आशियाई देशांमध्ये मोठय़ा चवीने खाल्ले जाते. त्यामुळे तेथील खवय्यांचे चोचले भागविण्यासाठी आपल्या देशातून अशा समुद्री वन्य जिवांची बेकायदेशीपणे तस्करी केली जाते. हिंदुस्थानला अरबी समुद्राने चहुबाजूने वेढलेले आहे. समुद्राच्या पोटात विविध प्रकारांचे, आकारांचे वन्य जीव नांदत असतात. आपल्या देशातील वन्य जीव सुरक्षा कायद्यानुसार त्या समुद्री वन्य जिवांना विशेष सुरक्षा पुरविण्यात आली आहे. परंतु झटपट पैसा कमविण्यासाठी तस्कर या कायद्याला धुडकावून लावत शिताफीने त्या वन्य जिवांची तस्करी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. अलीकडेच गुजरातच्या पोरबंदर येथे बेकायदेशीरपणे डॉल्फिन माशांची तस्करी करणाऱयांना पकडण्यात आले होते. जवळपास 22 डॉल्फिन माशांना पकडून त्यांना ठार मारण्यात आले होते. त्या डॉल्फिनचे तुकडे करून त्याचा वापर शार्क माशांना पकडण्यासाठी केला जाणार होता. डॉल्फिन माशांचे तुकडे करून ते शार्क माशांना खाण्यासाठी समुद्रात फेकले जाणार होते. ते तुकडे खाण्यासाठी शार्क मासे येतात. मग त्या ठिकाणी सापळा रचून शार्क माशांना पकडले जाते. अशा प्रकारचा शार्क माशांना ट्रप लावण्यासाठी डॉल्फिन माशांची तस्करी केली जात होती. परंतु स्थानिक तटरक्षक दलाने ती तस्करी पकडली आणि तेथील वन विभाग तसेच पश्चिम विभाग मुंबई वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या मदतीने त्या तस्करांना पकडून त्यांच्याकडून 22 डॉल्फिन माशांना ताब्यात घेतले. शार्क माशांची मागणी लक्षात घेऊन तस्कर डॉल्फिन माशांचा बळी घेत होते. म्हणजे डॉल्फिन आणि शार्क माशांना टार्गेट केले जात असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, जेएनपीटी बंदरात कस्टम विभागाच्या मदतीने पश्चिम विभाग मुंबई वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने सुकवलेल्या अवस्थेतील शार्क माशांचे पंख, समुद्री घोडे आणि पाईप फिश यांची मोठय़ा प्रमाणात होणारी तस्करी पकडली होती. शार्क माशांचे पंख, समुद्री घोडे आणि पाईप फिश हे सुकवून ते सूपमधून अथवा फ्राय करून मोठय़ा चवीने खाल्ले जातात. त्याला किंमतदेखील चांगलीच मिळत असल्याने तस्करांचे त्यात फावते. जेएनपीटी बंदरातून सुकवलेल्या अवस्थेत पाईप फिश, समुद्री घोडे आणि शार्क माशांचे पंख दक्षिण आशियाई देशांत पाठविण्याचा प्रयत्न केला जात होता, पण कस्टम आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने तो वेळीच हाणून पाडला. याशिवाय मुंबईच्या विमानतळावर कासवदेखील मोठय़ा संख्येने पकडण्यात आले होते.
हिंदुस्थानमध्ये वन्य जीव व समुद्री जीव यांना अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या देशात विशेष वन्य जीव सुरक्षा कायदा अस्तिवात आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व ही नैसर्गिक संपत्ती जतन करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु ड्रग्ज तस्कर, सायबर भामटय़ांप्रमाणे वन्य जिवांची तस्करी करणारे समाजकंटकदेखील असल्याने त्यांना रोखणे हीच आपली प्राथमिकता आहे. आम्ही कस्टम, फॉरेस्ट डिपार्टमेंट तसेच अन्य सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमांतून वन्य जिवांची तस्करी करणाऱयांना पकडण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करतोच, परंतु नागरिकांना अशा प्रकारे वन्य जिवांची तस्करी होत असल्याचे कळले तर तत्काळ सुरक्षा यंत्रणेला संपर्क साधून आपल्या अनमोल संपत्तीचे रक्षण करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन पश्चिम विभाग मुंबई वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे प्रमुख आयएफएस योगेश वर्कड करतात. मुळात देशाच्या संपत्तीचे रक्षण करणे हे प्रत्येक देशवासीयाचे कर्तव्यदेखील बनते.