नैतिक मुल्यांवर अढळ श्रद्धा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला – अशोक चव्हाण

सामना प्रतिनिधी । नांदेड

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

वाजपेयी यांच्या मनमिळावू स्वभावामुळे स्वपक्षासोबतच इतर पक्षातही त्यांचे अनेक मित्र होते. देशाचे माजी गृहमंत्री व आमचे वडील स्व. डॉ. शंकरारव चव्हाण साहेबांशी अटलबिहारी वाजपेयी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते असे चव्हाण यांनी सांगितलं. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला वाजपेयी आवर्जून उपस्थित राहून पक्षाच्या पलीकडे जात त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केल्याचे आजही आपल्या स्मरणात असल्याचे चव्हाण यांनी सांगीतले. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी आपला शोक व्यक्त केला.