भोंदू अशोक खरातची ईडी चौकशीही होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारकडून कठोर कारवाई केली जाणार अशी माहिती असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांपासून ते महिलांवरील अत्याचारांपर्यंत सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असून दोषींना कडक शिक्षा दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले की, खरातचे विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार शोधून काढले जात आहेत. त्यांची संपूर्ण मालमत्ता, गैरव्यवहार आणि महिलांवरील अत्याचार या सर्व बाबी उघड करून कठोरातली कठोर शिक्षा देण्यात येईल. या प्रकरणात महाराष्ट्रात सर्वसामान्यांमध्येही एकमत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले असून दररोज नवे तपशील समोर येत आहेत. विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करत असून तपासाची माहिती रोज सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. योग्य वेळी एसआयटी सर्व माहिती जाहीर करेल, त्यामुळे या तपासावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाकडून सुरू असलेली चौकशी. फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणाची ईडीकडून चौकशी निश्चित होणार असून त्यांनी आधीच या प्रकरणाची दखल घेतली आहे. संबंधित आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीने कारवाई सुरू केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मनी लॉन्डरिंग आणि आर्थिक अनियमिततेच्या तपासाला आता अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे.