
मुलगा होण्याचे भाकीत वर्तवून गरोदर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरात याला गुरुवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. तुमचा विनाश करील, अशी धमकी देत मिरगाव येथील शेतजमीन बळकावल्याचा व फसवणुकीचा गुन्हा सिन्नर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याप्रकरणी दाखल दुसऱ्या गुह्यात अशोक खरात याला काल बुधवारी न्यायालयीन कोठडी मिळाली. सात महिन्यांची गरोदर असलेल्या महिलेला मुलगाच होईल, असे सांगून पूजाविधीच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार केल्याचा तिसरा गुन्हा खरातविरुद्ध दाखल झाला आहे. या गुह्यात त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. एसआयटी आता पुढील तपास करीत आहे. एसआयटीने सकाळी खरातच्या नाशिक येथील कॅनडा कॉर्नर भागातील ओकस प्रॉपर्टी कार्यालयात तपासणी केली. बावीस रुद्राक्ष मणी, ए टू झेडपर्यंतची इंग्रजी अक्षरे, एक ते सव्वीसपर्यंतचे अंक असलेली पट्टी, मिरगाव येथील शिवनिका संस्थानचे कोरे पावती पुस्तक, भिंग, हिरव्या रंगाचे द्रव्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आयकर, धर्मादायकडून चौकशी
खरात व त्याच्या कुटुंबाच्या नावे देशभर ठिकठिकाणी बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. या बेहिशेबी मालमत्ता व व्यवहाराबाबत आयकर खात्याकडून चौकशी सुरू झाली आहे. शिवनिका ट्रस्टच्या नावे पैसे जमविल्याच्या संशयावरून धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत विशेष चौकशी केली जात आहे.
शेतजमीन खरेदीत फसवणूक
मिरगाव येथे खरात याने शिवनिका ट्रस्टचे महादेव मंदिर उभारले आहे. याच ठिकाणी कोट्यवधींचे आलिशान फार्म हाऊस आहे. ही जमीन खरात याने भीती दाखवून कवडीमोल भावात खरेदी केली. याप्रकरणी खरातवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
‘ते’ आयकर अधिकारी खरे की बोगस?
खरातच्या भाकितानंतर अनेकांच्या घरी काही आयकर अधिकारी गेले होते. अवैध संपत्ती जमविल्याची भीती दाखवून लाखो रुपये लुटले गेले आहेत. विक्रीकर, तसेच लाचलुचपत प्रतिबंधकसह अन्य विभागांचे अधिकारी असल्याचेही सांगून अनेकांकडून कारवाई टाळण्यासाठी लाखो रुपये उकळण्यात आले आहेत. हे अधिकारी खरे होते की, खरातने पाठविलेले बोगस अधिकारी होते, याबाबत शहरात चर्चा सुरू आहे. एसआयटीकडे काहींनी धाव घेतली आहे, त्याची शहानिशा केली जात आहे.




























































