अधिवेशनाच्या ओळखपत्रावरील अशोकस्तंभ गायब

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अधिकृत ओळखपत्रावरील अशोकस्तंभाचे चित्र या वर्षी गायब झाले आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नव्या वादाला तोंड फुटले. पुढील काही दिवसांत हा मुद्दा पुन्हा पेटणार आहे.

विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनासाठी महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाच्या वतीने पत्रकार, टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी, कॅमेरामन, पोलीस, कंत्राटी कामगार, विविध सेवा पुरवणाऱ्यांना विधान भवनात प्रवेश करण्यासाठी अधिकृत ओळखपत्र दिले जाते. या ओळखपत्रावर संबंधितांचा फोटो आणि विधानमंडळ सचिवालयाचा स्टँप असतो. या ओळखपत्राच्या मध्यभागी अशोकस्तंभाचे चित्र असते. पण पावसाळी अधिवेशनासाठी वितरित करण्यात आलेल्या ओळखपत्रावरून अशोकस्तंभाचे चित्र यंदा गायब झाले आहे.

आतापर्यंतच्या प्रत्येक अधिवेशनाच्या ओळखपत्राच्या मध्यभागी अशोकस्तंभ विराजमान झालेला होता. पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात प्रथमच अशोकस्तंभ गायब झाला आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. आता कामकाजाच्या पुढील काही दिवसांत ओळखपत्रावरील अशोकस्तंभाचा मुद्दा सभागृहात उपस्थित होण्याची शक्यता आहे.