
>> आशुतोष बापट
कंबोडियामधील ता प्रोम इथली मंदिरे म्हणजे एक राजेशाही मठच. रेशमाच्या आणि अन्य काही झाडांनी कवेत घेतलेली ही मंदिरे त्या भग्न अवशेषांतूनही तिथल्या स्थापत्य शैलीची श्रीमंती दर्शवतात.
कंबोडियाचा समृद्ध असा मंदिरांचा वारसा हा कालांतराने लोकांच्या विस्मरणात गेला. त्याची अनेक कारणे आहेत. जसे अस्तंगत झालेल्या राजसत्ता, उठलेली गावे, अज्ञातवासात गेलेली वारसा स्थळे. लोकांचा त्या ठिकाणचा पायरव बंद पडणे आणि अर्थातच त्यामुळे तो संपूर्ण परिसर घनदाट झाडीने वेढला जाणे. इतकी गर्द झाडी की त्यात असा काही स्थापत्याचा अनमोल ठेवा असेल असे कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही इतकी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक मंदिरांना मोठमोठय़ा वृक्षांनी आपल्या अजस्त्र अशा फांद्यांनी लपेटून घेतले. सगळे मंदिर जणू काही कवेत घ्यावे अशी अवस्था इथल्या स्थापत्याला प्राप्त झाली. ता प्रोमची मंदिरेही याला अपवाद नव्हती, परंतु कुशाग्र बुद्धीचा मानव समोर आलेल्या कुठल्याही परिस्थितीचे संधीमध्ये कसे रूपांतर करून घेतो आणि त्याच जोरावर आपल्या वारसा स्थळांचे एक अनोखे सादरीकरण जगासमोर कसे करतो याचेही उत्तम उदाहरण म्हणजे ही ता प्रोमची मंदिरे.
ता प्रोम हे ठिकाण आहे तसेच राखून ठेवायचा निर्णय केला गेला. 19 व्या शतकात जेव्हा कंबोडियातील या सगळ्या मंदिर स्थापत्याचा शोध लागला तेव्हा इथली मंदिरे कुठल्या अवस्थेत होती हे लोकांच्या लक्षात यावे म्हणून ता प्रोम इथली मंदिरे प्रायोगिक तत्त्वावर जशी आहेत तशीच राखून ठेवली गेली. रेशमाच्या अनेक झाडांची इथे अगदी रेलचेल आहे. या रेशमाच्या आणि अन्य काही झाडांनी कवेत घेतलेली ही ता प्रोम मंदिरे हे पर्यटकांचे मोठे आकर्षण केंद्र झाले आहे. जर ही सगळी झाडे तोडून टाकली असती तर पूर्णपणे त्या झाडांच्या आधारावर उभी असलेली ही मंदिरेसुद्धा कोसळली असती. त्यामुळे मंदिरांची प्रवेशद्वारे आधी मोकळी केली गेली. त्यानंतर त्या मंदिराच्या आतमध्ये आलेल्या झाडाच्या अजस्त्र मुळ्या काढून टाकल्या. तेवढय़ापुरता तिथे लोखंडी फ्रेमचा आधार दिला गेला. जवळ जवळ सगळे मंदिर आतून मोकळे केले.
आतून मंदिरांचे प्रदक्षिणामार्गसुद्धा जिथे शिल्लक होते तेसुद्धा असेच मोकळे केले गेले, पण बाहेरून मात्र त्या झाडांचे आच्छादन मंदिरांवर असेच राहू दिले. आता दिसणारा मंदिरांचा हा नजारा अतिशय देखणा दिसतो. खूप उंच पांढऱया खोडाचे झाड, त्याने मंदिराला कवेत घेतलेले आणि एका सुंदर अशा कमानीतून मंदिरात प्रवेश करता येतो. अगदी जिथे अशक्य आहे तिथे मंदिराच्या आत जाण्याचा मार्गदेखील बंद केलेला आहे.
ही मंदिरे बांधली ती अंकोर साम्राज्याचा बलाढय़ सम्राट जयवर्मा सातवा याने. मंदिर बांधणीचे पुण्य आपल्या आईला मिळावे म्हणून याने तिच्यासाठी या मंदिराची बांधणी स.न. 1186 मध्ये केली. या मंदिरातली मुख्य देवता आहे `प्रज्ञापारमिता.’ बौद्ध धर्मातील ज्ञानाची आणि शहाणपणाची समजली जाणारी ही देवता होय. आपल्या आईसाठी हे मंदिर राजाने बांधले असल्यामुळे या देवतेचा चेहरा हा राजाच्या आईच्या चेहऱयासारखा कोरला गेला आहे. कंबोडियामधली ही तत्कालीन शैलीच असावी असे वाटते. जसे अंकोर थॉम या मंदिरांवर असलेले मानवी चेहरे हे राजाच्या चेहऱयासारखे असल्याचे सांगतात, तसेच इथेसुद्धा बघायला मिळते.
ता प्रोमचे मूळचे नाव आहे `राजविहार.’ ता प्रोम इथली मंदिरे म्हणजे खरे तर एक राजेशाही मठच म्हणायला हवा. सुरुवातीला इथे 250 पेक्षा जास्त देवदेवतांची प्राणप्रतिष्ठा केल्याचे समजते. अजूनही काही देवता नंतरच्या काळात इथे आणल्या गेल्या. या ठिकाणी मिळालेल्या काही शिलालेखातील उल्लेखानुसार ता प्रोम इथे एक मोठे गावच वसत होते. या गावाची लोकसंख्या 12640 इतकी होती. या मंदिराभोवती पण कंबोडियातील इतर मंदिरांप्रमाणे एक खंदक असून त्यावर असलेल्या पुलावरून आपला मंदिर परिसरात प्रवेश होतो. पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे आणि अर्थातच त्यावर नागशिल्पे. सगळा परिसर शांत आणि रमणीय आहे. जरी भग्न अवशेष असले तरीसुद्धा स्थापत्य शैलीची श्रीमंती आजही उभ्या असलेल्या इमारती आपल्याला दाखवत असतात. आत प्रवेश करताना जो दरवाजा आहे त्याच्या वर असलेल्या शिखरांवरसुद्धा मानवी चेहरे कोरलेले इथे पाहायला मिळतात. अंकोर थॉमच्या कालखंडातले हे मंदिर असल्यामुळे साहजिकच इथेसुद्धा तीच स्थापत्य शैली केलेली दिसते. विविध देवदेवतांची शिल्पे भिंतींवर बघायला मिळतात. त्या सर्वांची वेशभूषा आणि त्यांच्या डोक्यावर असलेले मुकुट हे खास ख्मेर पद्धतीचे असल्यामुळे अतिशय वेगळ्या आणि आकर्षक स्वरूपात ही सगळी शिल्पे आपल्यासमोर येतात.
सगळा मंदिर परिसर पाहायला एक तास पुरतो. त्यातला जास्त वेळ हा फोटो काढण्यातच जातो. रेशमाची उंचच उंच झाडे आणि इतर घनदाट वृक्षांनी सगळा परिसर रम्य झालेला असतो. इथे अजून एक गोष्ट नमूद करायला हवी आणि ती म्हणजे या मंदिराच्या संवर्धनासाठी, दुरुस्तीसाठी भारतीय पुरातत्व खात्याने मोलाची मदत केलेली आहे. त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला फलक इथेच सुरुवातीला लावून ठेवलेला आहे. प्राचीन ठेव्याची जपणूक करण्यासाठी भारतीय पुरातत्व खाते भारताबाहेरही मदतीचा हात पुढे करते आणि त्यायोगे सांस्कृतिक ठेवा जपला जातो, ही जाणीव नक्कीच अभिमानास्पद आहे.

























































