उद्योगविश्व – प्रयोगशील शेतीने वाढवली उत्पादन क्षमता

>> अश्विन बापट

नव्या तंत्राच्या सहाय्याने प्रयोगशील शेती करत कोळंबे गावच्या विश्वास दामलेंनी शेतीची उत्पादन
क्षमता वाढवली. त्यांच्या या दमदार वाटचालीची यशोगाथा.
सध्या शेती क्षेत्रात तंत्राच्या सहाय्याने मोठे बदल घडत आहेत. याच तंत्राची कास धरून शेती व्यवसायाला नवे आयाम देणारे काही प्रयोगशील शेतकरी आपल्याकडे आहेत. रत्नागिरीच्या कोळंबे गावचे विश्वास दामले यापैकीच एक. शेती क्षेत्रात पहिलं पाऊल कधी ठेवलं? असं विचारलं असता ते म्हणाले, ‘मी 1991 मध्ये एसएससी झालो आणि लागलीच शेतीकडे वळलो. त्या वेळी माझ्या वडिलांनी 150 आंब्याची कलमं, 50 सुपारीची झाडं, 1 काजूचं झाड, 20 नारळाची झाडं असा विस्तार केलेला होता. मी त्यांच्यासोबत काम करू लागलो आणि आंब्याच्या झाडांची संख्या 150 वरून 250 वर नेली. शिवाय 12-13 गायींसह दुधाचाही व्यवसाय सुरू होता. तेव्हा 12 कामगारांसह आम्ही हा व्यवसाय सुरू केला. 1990 च्या दशकात शेतासाठी पुरेशी वीज उपलब्ध नव्हती. रस्तेही फार बरे नव्हते. पाणी डोक्यावरून वाहून न्यावं लागत असे. माझा भाऊ विवेक 1994 मध्ये दहावी झाला आणि आम्ही पहिली गुड्स कॅरिअर टाटा 709 घेतली. तिथून आमच्या खिशात चार पैसे आणखी खेळू लागले. याचं कारण आमच्या मालाची ने-आण या गाडीने होतच असे, शिवाय आम्ही ही गाडी भाडय़ाने देऊ लागल्याने तोही पैसा मिळू लागला.’

पुढे त्यांनी अधिक माहिती देत या क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ‘माझ्या बाबांच्या काळातलं सांगायचं झालं तर बाबा होडीने जाऊन मालाची विक्री करत असत. साधारण 100 पोती भात पिकत असे. तेव्हा जे कामगार शेतीत काम करायला येत त्यांना त्या मोबदल्यात धान्य दिलं जाई. तेव्हा पैशांचा व्यवहार फार होत नसे. ही गोष्ट 70 आणि 80 च्या दशकातली आहे. पुढे मी वडील आणि भावाच्या साथीने शेतीचं उत्पादन वाढवतानाच त्याला आधुनिक टच देण्याचा प्रयत्न केला. मग 2005 च्या सुमारास आम्ही बागेत रस्ते करून घेतले. पॉवर स्प्रेचीही मोठी मदत आम्हाला झाली. शिवाय आंबे काढण्यासाठी प्रगत जाळीही आम्ही उपयोगात आणली. वेळ वाचू लागला, काम वेगाने होऊ लागलं. आता 2025 चं सांगायचं झाल्यास आमच्याकडे 2250 आंब्याची झाडं आहेत. त्यातील 1265 ही सेंद्रिय पद्धतीने कसायची आहेत. यादृष्टीने आमच्या गावासाठीही मी प्रयत्न करून गावकऱयांमध्येही या सेंद्रिय शेतीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.

2012 ला कोळंबे ग्रामपंचायतीला सरकारच्या कोरडवाहू शाश्वत शेती योजनेसाठी 50 लाखांचं अनुदान मिळालं. याबाबत ते पुढे सांगतात, ‘हे आमच्या गावासाठी मोठं पाऊल होतं. माझाही नवनवीन प्रयोग करण्याकडे नेहमी कल राहिलाय. नारळ, सुपारीच्या फांद्या, जंगली पालापाचोळा यांचा भुगा करून घ्यायचा. त्यात गोमूत्र, शेण, जिवामृत टाकलं की, माझ्या पिकांसाठी उत्तम खत तयार होतं. हे सारं शेल्डर नावाचं मशीन आम्हीच तयार केलंय, त्यापासून होतं.

शेती म्हटलं की निसर्गाच्या आव्हानांना सामोरे जावे लागते याबाबतीतील त्याचा अनुभव ते सांगतात, ‘तौत्ते आणि फयानसारख्या वादळाने आमच्यासमोर आव्हानात्मक स्थिती निर्माण केली होती. तौत्तेच्या वेळी तर आंबे झाडावरून वाऱयाच्या वेगाने पडून आमच्या समोर पाण्यातून वाहून गेल्याचं वेदनादायी दृश्य आम्हाला पाहावं लागलं. त्यातूनही आम्ही निर्धाराने उभे राहिलो. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँकेचं सहकार्य लाभलं. आमची वाटचाल पुन्हा सुरू झाली.’

विश्वास दामले त्यांच्या शेतात वेगवेगळी पिकं घेतली जातात. ते सांगतात, ‘आजच्या घडीला हापूससह रायवळ आंब्याचंही पीक आम्ही घेतो. शिवाय आंबावडी, आंबा मावा, आंबा पल्प, फणसपोळी, फणसाचे गरे हीदेखील आमची उत्पादनं लोकप्रिय आहेत. साधारण 1000 किलो आंबापोळी, फणसपोळी आणि इतर उत्पादनं तर आंबा पल्प किंवा रस 2000 लिटर अशी आमची सध्याची उत्पादन क्षमता आहे. आताच्या घडीला 20 कायमस्वरूपी कामगार आहेत, ज्यात सीझननुसार 50 पर्यंत वाढ करतो. शिवाय आमच्या पिकांना कीड-रोगांचा त्रास होऊ नये म्हणून कडुनिंबाचा पाला, हिरवी मिरची, अडुळसा, लसूण आदींपासून औषधं बनवतो, जे आमच्याच शेतीसाठी वापरतो. आमची उत्पादनं पुणे, मुंबई, इचलकरंजी, कोल्हापूरपर्यंत सध्या जातायत. त्याच्या विस्तारासह आगामी काळात सेंद्रिय शेतीला अधिकाधिक चालना कशी मिळेल, यादृष्टीनेच आम्ही प्रयत्न करणार आहोत.’

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर
प्रोडय़ुसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)