
पहिल्या दोन लढतींप्रमाणे बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यातील सामनाही एकतर्फी रंगला. बांगलादेशने हाँगकाँगला 143 धावांत रोखल्यानंतर कर्णधार लिटन दासच्या तडाखेबंद 59 धावांच्या खेळीने संघाला 7 विकेट आणि 14 चेंडू राखून सहज विजय मिळवून दिला. कर्णधार दासच या विजयाचा मानकरी ठरला. टॉस जिंकलेल्या बांगलादेशने हाँगकाँगला फलंदाजीला आमंत्रित करत त्यांच्या डावाला 143 धावांपर्यंत पोहचू दिले. बांगलादेशच्या तस्किन अहमद, तंझिम हसन आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतले. त्यानंतर 144 धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशची सलामीची जोडी 47 धावांत माघारी परतली. मग लिटनने हाँगकाँगच्या गोलंदाजीला फोडून काढताना तौहिद हृदॉयसह 95 धावांची भर घातली. विजयाच्या उंबरठय़ावर असताना लिटन बाद झाला. पुढे तौहिदने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.