हिंदुस्थानच्या तन्वी पत्री हिने चेंग्दू (चीन) येथे रविवारी व्हिएतनामच्या थी थू हुयेन गुयेन हिचा सरळ सेटमध्ये धुक्वा उडवत आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील 15 वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.अव्वल मानांकित 13 वर्षीय तन्वी पत्री हिने अंतिम लढतीत द्वितीय मानांकित थी थू हिचा 22-20, 21-11 असा 34 मिनिटांत खेळ खल्लास करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या जेतेपदासह तन्वी ही सामिया इमाद फारुकी व तस्नीम मीर यांच्या पंगतीत जाऊन बसली. या दोघींनी अनुक्रमे 2017 व 2019 मध्ये या स्पर्धेतील 15 वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले होते.तन्वीने या संपूर्ण स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवले. एकूण खेळलेल्या पाच लढतींमध्ये तिने एकही गेम गमावला नाही हे विशेष! अंतिम लढतीत तन्वी पहिल्या गेममध्ये एकवेळ 11-17 अशी पिछाडीवर होती. मात्र, त्यानंतर व्हिएतनामच्या खेळाडूने अनेक चुका केल्याचा फायदा उठवत तन्वीने हा गेम जिंकला.