आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना (आयबीए) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे टोकियो आणि पॅरिसच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीची प्रक्रिया खुद्द आयओसीनेच सांभाळली होती. त्यातच आशियाई संचालन संस्थेने गुप्त मतदानाद्वारे आयबीएच्या बाजूने मतदान करत बॉक्सिंगचे भवितव्य आणखी धोक्यात आणले आहे. गुप्त मतदानाद्वारे झालेल्या मतदान प्रक्रियेत 21 देश आयबीएच्या बाजूने उभे राहिलेत, तर नव्याने स्थापन झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंगला केवळ 14 जणांचाच पाठिंबा लाभलाय. त्यामुळे जागतिक बॉक्सिंग महासंघांमध्ये सुरू असलेली जोरदार ठोशेबाजी संपण्याची चिन्हे धूसर झाली आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून आयबीए आणि वर्ल्ड बॉक्सिंगमध्ये सुरू असलेल्या वादामुळे बॉक्सिंग या खेळात उभी फूट पडली आहे. त्यामुळे या खेळाच्या ऑलिम्पिक पात्रता आयओसीकडून पाहिली जात आहे आणि आयबीएचा या पात्रतेला विरोध आहे. युरोपियन राष्ट्रे वर्ल्ड बॉक्सिंगच्या बाजूने उभी राहिल्यानंतर आशियाई देशांकडूनही त्याच निर्णयाची अपेक्षा होती, पण अबुधाबीच्या अल एन शहरात झालेल्या आशियाई संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या गुप्त मतदानात 21 देशांनी आयबीएला पाठिंबा दर्शवला आहे. 14 देश त्यांच्या विरोधात उभे राहिले असून त्यांनी वर्ल्ड बॉक्सिंगला आपले मत दिले आहे. या प्रकारामुळे 2028 साली लॉस एंजिल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक खेळातही बॉक्सिंगच्या समावेशाबाबत अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जगभरात बॉक्सिंगमध्ये पडलेली उभी फूट बॉक्सिंगच्या ऑलिम्पिक प्रवेशाला धोक्यात आणणारी ठरण्याची शक्यता वाढलीय.
आयबीएचा विरोध फक्त वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी
आज झालेल्या गुप्त मतदानानंतर आयबीएने वर्ल्ड बॉक्सिंगवर जोरदार हल्ला चढवला, या संघटनेकडे बॉक्सिंगच्या भवितव्याबाबत कोणतीही योजना नाही, धोरण नाही, आयोजनासाठी आर्थिक रसद नाही, अनुभव नाही आणि जगातील अनेक देशांचा पाठिंबा नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना बॉक्ंिसगचा विकासही करायचा नाही. तरीही संघटना बॉक्ंिसगचे नुकसान करतेय. आयबीएने आशियाई संस्थेच्या पाठिंब्याचे मनापासून आभार मानले. हा निर्णय आयबीएने बॉक्सिंगच्या विकासासाठी, प्रगतीसाठी वर्षानुवर्षे घेतलेल्या कठोर मेहनतीचे प्रतीक आहे. आयबीएच बॉक्सिंगच्या एकतेची खरी ताकद आहे. मात्र आमच्या विरोधात मतदान करणाऱ्या देशांवरही आयबीए बरसली. आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काही संघटना दुसरीकडे गेल्या आहेत. त्यांना बॉक्सिंगच्या भवितव्याशी काहीएक घेणेदेणे नसल्याचाही टीका आयबीएने केले. विशेष म्हणजे हिंदुस्थानच्या बॉक्सिंग महासंघानेही वर्ल्ड बॉक्सिंगला आपला पाठिंबा मे मध्येच दर्शवला होता आणि आशियातील जास्तीत जास्त संघटनांना वर्ल्ड बॉक्सिंगमध्ये आणण्यासाठी आपली ताकद लावली होती. त्यामुळे आशियाई संस्थेचा विरोधही हिंदुस्थानी महासंघाला झेलावा लागल्याचे कळले आहे.