
आसामच्या नागांव जिल्ह्यातील धिंग येथे तीन नराधमांनी मिळून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. याविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. अशातच आता या प्रकरणातील मुख्य आरोपी तफजूल इस्लाम याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी पोलीस त्याला क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी घटनास्थळी घेऊन जात होती. यावेळी त्याने तलावात उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र यादरम्यान पाण्यात बुडून मृत्यू झाला.
बलात्कार प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी पोलीस आरोपी तफजूल इस्लाम याला घटनास्थळी घेऊन जात होते. मात्र पहाटे चारच्या सुमारास त्याने घटनास्थळा जवळील तलावामध्ये उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान तो बुडाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. जवळपास दोन सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह हाती लागला.
याबाबत नागांवचे एसपी स्वप्ननील डेका यांनी सांगितले की, शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली होती. सामूहिक बलात्कार प्रकरणातील तो प्रमुख आरोपी होता. अधिक चौकशी करण्यासाठी त्याला घटनास्थळी नेण्यात येत होते, मात्र त्याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याने तलावात उडी घेतली.
आरोपी फरार होऊ नये म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि एसडीआरएफला पाचारण करण्यात आले. शोधमोहिमेदरम्यान त्याचा मृतेदह हाती लागला. या सर्व घडामोडीवेळी एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे, अशी माहितीही डेका यांनी दिली. तसेच इतर दोन आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही बेड्या ठोकण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना धिंग परिसरात घडली आहे. गुरुवारी सायंकाळी पीडित मुलगी ट्यूशनवरून घरी परत असताना तिघांनी तिचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नराधमांनी तिला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर टाकून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.