बेशुद्ध महायुतीला शुद्धीवर आणण्यासाठी ‘बंद’ यशस्वी करा, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर शाळेत झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला यशस्वी करा असे आवाहन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केले आहे. राज्यात महिला आणि बालिकांवर वाढत्या अत्याचाराबाबत वडेट्टीवार यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात महिला आणि बालिका मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत आहेत. हे महाविनाशी सरकार महिलांचे संरक्षण करण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे, अशी टीका विधानसभा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

नाशिक येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीनंतर वडेट्टीवार बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या कारभाराची चिरफाड करत सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.

लोकसभेत लोकांनी महायुती सरकारला नाकारले म्हणून महायुतीने लाडकी बहीण योजना आणली. येत्या विधानसभा निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी महायुतीचा हा प्रयत्न आहे. खरं तर पंधराशे रूपयांपेक्षा माता-भगिनीं, चिमुकल्यांना संरक्षण देण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी अशा योजना आणल्या जात आहेत. जनता या महाविनाशी सरकारला विटली असून या महाविनाशी सरकारची नितीमत्ता भ्रष्ट झाली असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

बेशुद्ध महायुतीला शुद्धीवर आणण्यासाठी येत्या 24 तारखेचा बंद यशस्वी करा, असे आवाहन करत हा बंद राजकीय नसल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राला आता अस्थिर केले जात आहे. महाराष्ट्राचे पुरोगामित्व संपवण्याचे काम महायुती सरकार पद्धतशीर करत आहे. एकमेकांच्या धर्माबद्दल अपशब्द बोलून दंगली पेटवल्या जात आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या वाढते आहे. उद्योग बाहेर जात आहेत. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी श्वेत पत्रिका काढून गुजरातला किती उद्योग गेले ते सांगितले पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.