
येत्या 8 डिसेंबरपासून उपराजधानी नागपूरमध्ये सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आठवडाभर चालणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचे कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार अशी चिन्हे आहेत.
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे अनेक वेळा पुढे ढकलावी लागलेली विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधानभवनात पार पडली. या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषदेतील कामकाजाचा कालावधी निश्चित करण्यात आला. त्यानुसार सोमवार 8 डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होईल. 13 डिसेंबर शनिवार आणि 14 डिसेंबर रविवार या दोन शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
विरोधी पक्षनेते जाहीर करा
सध्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेते नाहीत. घटनेनुसार विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे आणि हे संवैधानिक पद आहे. त्याला कायद्याचा आधार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि विधिमंडळाच्या नियमात विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे अशी तरतूद केली आहे. यामुळे येत्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते पद जाहीर करावे, अशी मागणी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी बैठकीनंतर बोलताना केली.




























































