विधानसभेचे अध्यक्ष मॅनेज,  नितीन देशमुख यांचा आरोप

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयातील कंत्राटी संगणक चालक पदावरील महिलेचा विनयभंग करणाऱया उपविभागीय अधिकारी डी. बी. कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे या अधिकाऱयावर बडतर्फीची कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी कार्यालयात आज ठिय्या आंदोलन केले. यावेळी देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप केला.

या प्रकरणात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी लावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. उलट आरोप असलेले अधिकारीच ही लक्षवेधी लागणार नाही. विधानसभा अध्यक्ष मॅनेज झालेत, असे सांगत असल्याचे देशमुख म्हणाले. अध्यक्षांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक न घेतल्याने आपण आज अधिवेशनाला हजर न राहता एका बहिणीच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन करीत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

निलंबनाचे आदेश निघाले

राजेंद्र इंगळे यांच्यावर या प्रकरणात मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांच्या निलंबनाचा आदेश सायंकाळी काढण्यात आला. तर उपविभागीय अधिकाऱयावरील कारवाईचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला जाणार आहे, असे सांगण्यात आले.