विलीनीकरणाच्या मुद्दय़ावर भाजपसोबत चर्चा करणे गरजेचे, सुनील तटकरे यांनी भूमिका केली स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण असा काही मुद्दाच नव्हता. आमचा पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे, म्हणजे भाजपचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे आमच्या विलीनीकरणाबद्दल भाजपसोबत चर्चा करणे गरजेचे आहे, राष्ट्रीय अध्यक्षांची निवड योग्यवेळी केली जाईल. अशी भूमिका अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली.

अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारमध्ये मंत्रिपदे आम्हाला देण्यात आली. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढवली. आताही आम्ही केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत आहोत. त्यामुळे आमच्या विलीनीकरणाबद्दल भाजपसोबत चर्चा करणे गरजेचे आहे. 2019मध्ये मविआ स्थापन करत असताना सोनिया गांधींची परवानगी मागण्यात आलीच ना? कारण तो यूपीएमधील महत्त्वाचा पक्ष आहे. युती-आघाडी करत असताना महत्त्वाच्या पक्षासोबत चर्चा करावी लागत असते, असे सुनील तटकरे म्हणाले.

कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन करणार?

विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार? मी गेले 2 ते 3 दिवस विचारतो आहे, पण त्यावर दुर्दैवाने कोणी काहीच बोलत नाही. ही चर्चा कोण सुरू करणार हा प्रश्न आहे. गेले 8 ते 10 महिने मी म्हणतोय की, आम्ही एनडीएमध्ये आहोत, जे भाजपसोबत येण्यासाठी अनुकूल आहेत तेच या चर्चा करू शकतात, नाहीतर चर्चा करण्याचा काही प्रश्नच नाही. अजित पवारांचा निर्णय असता तर माझा त्याला विरोध असण्याचा काही मुद्दाच नव्हता, असे तटकरे म्हणाले.