केदारनाथमध्ये बर्फवृष्टी, अटल टनेल बंद! उत्तर प्रदेशात वीज पडून पाच ठार, राजस्थानात गारपीट होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात पाच ते सहा राज्यांत अवकाळी पावसासह वादळी वाऱयाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचे नुकसान आणि खरीपाची तयारी करण्यास शेतकऱयांना उशीर होत आहे. यादरम्यान केदारनाथमध्ये प्रचंड बर्फवृष्टी झाली असून, अटल टनेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली, पंजाबसह 11 राज्यांमध्ये पावसाचा इशारा आहे. मध्य प्रदेशात 36 जिह्यांमध्ये पाऊस झाला. आज गारपीट होण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये 25 हून अधिक जिह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी बिकानेर, श्रीगंगानगर, जैसलमेरमध्ये गारपीटही झाली. तर, जयपूर शहरात रात्री उशिरा आलेल्या वादळामुळे वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.  वाळवंटी जिल्हे जैसलमेर-बिकानेरमध्ये गारांची चादर पसरली. अजमेरमध्ये वादळामुळे झाडे उन्मळून पडली आणि टीनशेड उडून गेले. पुढील तीन दिवस असेच हवामान राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील कोसीकला धान्य मंडईत 10 हजार पोत्यांमध्ये ठेवलेले 5 हजार क्विंटल गहू पावसात भिजले. हिमाचलची राजधानी शिमला येथे जोरदार वादळासह हलका पाऊस आणि लाहौल स्पीतीमधील उंच पर्वतांवर बर्फवृष्टी झाली.

5 ते 6 एप्रिलदरम्यान उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, हरयाणा, चंदीगड, बिहार, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये गारपिटीची शक्यता आहे.