सिमी पुन्हा रडारवर; एटीएसची भिवंडीच्या पडघा – बोरिवलीत पहाटेपासून छापेमारी, साकीब नाचणसह 22 जणांच्या घरांची झडती

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सतत संशयाच्या भोवऱयात असलेल्या पडघा-बोरिवली गावात आज एटीएसने कोम्बिंग ऑपरेशन केले. साडेतीनशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा गावात शिरला आणि पहाटे तीनपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण गावाची झडती घेतली. बंदी घातलेली संघटना सिमीशी संबंधित साकीब नाचण याच्या घरावरही एटीएसच्या पथकाने छापा टाकला. त्याशिवाय गावातील 22 जणांच्या घरांमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आले. घातपाताचा कट रचला जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

मुंबई साखळी बॉम्बस्पह्ट प्रकरणात साकीब नाचण याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो ठाणे कारागृहात होता. मात्र कारागृह प्रशासनाने त्याची 5 महिने 13 दिवस आधीच सुटका केली. तेव्हापासून बोरिवली गाव हे संशयाच्या भोवऱयात सापडले. आज पहाटे मुंबईच्या एटीएस पथकाने पुन्हा एकदा गावावर धडक देऊन कोम्बिंग ऑपरेशन केले. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीनशेहून अधिक पोलीस कर्मचारी तसेच शीघ्र कृती दलाच्या जवानांनी संपूर्ण गावाला वेढा दिला.

एटीएस पथकातील शंभर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साकीब नाचणसह आजूबाजूच्या घरात शिरून झडती घेतली. या कारवाईत ठाणे, नाशिक येथील 20 पथकांनीदेखील भाग घेतला.

तब्बल दहा तास सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये काही संशयित व्यक्तींचे मोबाईल हॅण्डसेट्स, तलवारी, सुरे, मालमत्ते संदर्भातील कागदपत्रे व दहशतवादाला चिथावणी देणारी अन्य कागदपत्रे ताब्यात घेतली.

या कारवाईमध्ये कुणालाही अटक करण्यात आली नाही. मात्र ज्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व अन्य दस्तऐवज जप्त केले आहेत. त्यांच्या तपासणीत काही आक्षेपार्ह आढळल्यास एटीएस चौकशीसाठी नोटिसा बजावणार.

कमालीची गुप्तता

या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पोलीस यंत्रणेकडून पाळण्यात आली होती. एकूण 22 पथकांमध्ये महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचासुद्धा सहभाग होता. कोणत्याही घरातील महिलांकडून कारवाईमध्ये अडथळा येणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती.