
बांगलादेशमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका हिंदू व्यवसायावर झालेल्या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला आहे. गेल्या दोन आठवड्यांत अल्पसंख्याक समुदायावर झालेल्या अशा प्रकारातील ही चौथी घटना आहे. खोकन चंद्र असे जखमी तरुणाचे नाव असून त्याला मारहाण, चाकूने वार केल्यानंतर जिवंत पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. खोकन याने जवळच्या तळ्यात उडी मारून जीव वाचवला. असे असले तरी खोकन यात गंभीररित्या भाजला असून तो जखमी झाला आहे.
ही घटना नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडली. 40 वर्षीय खोकन चंद्र हे केउरभंगा बाजारातले औषधांचे दुकान बंद करून घरी परतत होते. रात्री सुमारे 9 वाजता ते तिलोई परिसरात पोहोचताच काही गुंडांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार केले, त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. खोकन यांनी तात्काळ जवळच्या तळ्यात उडी मारल्यामुळे त्यांचा जीव वाचला. नंतर स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
गेल्या दोन आठवड्यांत बांगलादेशात हिंदू समुदायावर हल्ले किंवा हत्या झाल्याच्या चार घटना नोंदवल्या गेल्या आहेत. अल्पसंख्याकांवर टार्गेटेड हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.


























































