मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या नावाखाली विशिष्ट धर्माची नावे वगळण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप; एस.आय.आर मोहीम घाईगडबडीत न करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनरीक्षण मोहिमेतून (एसआयआर) जाणीवपूर्वक विशिष्ट जाती, धर्माची मते वगळण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सत्ताधारी पक्षाला यातून फायदा होईल अशा पद्धतीने ही मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात होणारी एसआरआर मोहीम कोणतीही घाईगडबड न करता निष्पक्षपणे राबवावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने आज करण्यात आली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेली. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान, सचिन सावंत, अॅड. संदेश काsंडविलकर, अभिजित सपकाळ आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात 2002-04 या काळात ही प्रकिया राबविण्यात आली होती. ही संपूर्ण मोहीम कोणत्याही घाईगडबडीत न करता जवळपास 13 महिन्यांच्या कालावधीत घेण्यात आली होती. आता 25 वर्षांनंतर ही प्रक्रिया होत असताना साडेतीन कोटींनी वाढलेल्या मतदारसंख्येचा विचार करून या प्रक्रियेचे नियोजन करावे. महाराष्ट्रात पुढील 2-3 वर्षांत कोणत्याही निवडणुका नसल्याने ही प्रक्रिया दीड-दोन वर्षे चालली तरी आक्षेप घेण्याचे कारण नाही. पुरेसा वेळ देऊन ही प्रक्रिया केल्यास जनतेच्या मनात संशयाची भावना राहणार नाही असे सकपाळ म्हणाले.

  • जनगणना आणि एसआयआर एकाच अधिकारी वा कर्मचाऱयाकडून करू नये.
  • राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना एसआयआरच्या सॉफ्ट कॉपी, ओसीआर किंवा मशीन रिडेबल स्वरूपात तसेच हार्ड कॉपी देण्यात याव्यात.
  • एसआयआरवर आक्षेप नोंदविण्यासाठी तसेच नोटिसीला उत्तर देण्यासाठी किमान एक महिन्याची मुदत देण्यात यावी.