शिवाजी पार्क येथील बालमोहन विद्यामंदिर या संस्थेची स्थापना जिथे झाली त्या ठिकाणी आज शिक्षणमहर्षी दादासाहेब रेगे यांचा आकर्षक नामफलक लावण्यात आला. या नामफलकाचे अनावरण हृद्य सोहळ्यात करण्यात आले. यानिमित्ताने दादासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
3 जून 1940 रोजी शिवराम दत्तात्रय रेगे ऊर्फ दादासाहेब रेगे यांनी शिवाजी पार्क येथील वास्तूत बालमोहन विद्यामंदिराची स्थापना केली. केवळ चार शिक्षक आणि आठ विद्यार्थी यांना सोबत घेऊन ही शाळा सुरू झाली. आज या शाळेत जवळपास तीन हजार विद्यार्थी शिकत असून ही महाराष्ट्रातील मराठी माध्यमाची अग्रगण्य मराठी शाळा आहे. मुलांचा केवळ शैक्षणिक नव्हे तर सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दादासाहेब झटले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 1962 साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ म्हणून दिल्लीत राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दादासाहेबांनी घालून दिलेल्या मूल्यांचे पालन करत शाळेची वाटचाल सुरू असून जिथे संस्थेची स्थापना झाली तिथेच आकर्षक असा दादासाहेब रेगे यांचा नामफलक उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण आज झाले. नामफलक अनावरण सोहळय़ाला बालमोहन विद्यामंदिरचे संचालक व विश्वस्त गुरुप्रसाद रेगे, विश्वस्त डॉ. आनंद उत्तुरे, सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.