
गोरेगाव (पूर्व) भागात आरे दुग्ध वसाहतीच्या जागेवर 30 शासकीय तबेले, वसाहती आहेत. या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या सूचना मुंबई महापालिका, पोलीस यांना देण्यात आल्या आहेत. या जागेवर अतिक्रमण होऊ देणार नाही, असे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात स्पष्ट केले.
शिवसेना आमदार बाळा नर यांनी ही लक्षवेधी मांडली होती. आरे वसाहतीमधील अतिक्रमणे आणि अवैध धंद्यांकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. मंत्री अतुल सावे म्हणाले, या वसाहतीच्या जमिनीवर अवैध धंदे होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून सुरक्षा रक्षक वाढविण्यात आले आहेत. या वसाहतीच्या प्रश्नासंदर्भात संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजनही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.