एकीकडे हिंदुस्थान आपले सुपर एट स्थान निश्चित करण्यासाठी भिडणार आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया नामिबियाचा सहज पराभव करून विजयाच्या हॅटट्रिकसह सुपर एटमध्ये धडक मारण्यासाठी सज्ज झाला आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक गटात चित्र बदलले असले तरी ऑस्ट्रेलिया आपल्या जोशात कायम आहे. त्यांनी ‘ब’ गटातून इंग्लंड आणि ओमानचा पराभव करत अव्वल स्थान पटकावले आहे आणि नामिबियाविरुद्धही त्यांचा सहज विजय अपेक्षित आहे. नामिबियाने ओमानचा पराभव केला असल्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास टी-20 वर्ल्ड कपमध्ये खळबळ माजेल, पण ऑस्ट्रेलियाचा संघ पाहता नामिबियाकडून अशा खेळाची अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरू शकते. पण टी-20 सामना हा अवघ्या एका षटकांत फिरू शकतो. त्यामुळे नामिबिया अत्यंत दुबळा संघ आहे, असे त्यांना हिणवणे चुकीचे ठरू शकते. नामिबियाने ओमानवर सुपर ओव्हरमध्ये केलेली मात कुणीही विसरलेला नाही. ते ऑस्ट्रेलियाविरुद्धही आपला खेळ उंचावण्याचा जोरदार प्रयत्न करतील, याबाबत तीळमात्र शंका नाही.
वर्ल्ड कपमध्ये गेल्या 22 सामन्यांत काही मोजकेच सामने मोठे झालेत. त्यापैकी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हा सामना होता. याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपली टी-20 वर्ल्ड कपमधली सर्वोच्च धावसंख्या उभारली होती आणि या स्पर्धेतील ते एकमेव सांघिक द्विशतकही होते. आतापर्यंत केवळ ऑस्ट्रेलियाच धावांचे द्विशतक गाठू शकला आहे. त्यामुळे उद्या नामिबियाविरुद्धही ते धावांचे द्विशतक गाठतील अशी अपेक्षा बाळगता येऊ शकते. तसेही ऑस्ट्रेलियाच्या ट्रव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नरला सूर गवसल्यामुळे ऑस्ट्रेलिया काहीही करू शकते. त्यामुळे नामिबियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया कोणते रंग दाखवणार, याबाबत सर्वानाच उत्सुकता लागली आहे.