ऑस्ट्रेलियाने बनवले बॅटरीवर चालणारे जहाज, 2100 प्रवासी, 225 चारचाकी गाड्या वाहून नेण्याची क्षमता

ऑस्ट्रेलियातील जहाज बनवणारी कंपनी इनकॅटने बॅटरीवर चालणारे जहाज बनवले आहे. हे जहाज जगातील सर्वात मोठे बॅटरीवर चालणारे जहाज आहे. इनकॅटने दक्षिण अमेरिकी जहाज ऑपरेटर बुकेबस सोबत मिळून हे जहाज बनवले आहे. हा प्रोजेक्ट आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट मानला जात आहे. या जहाजाचे नाव हुल 096 असे आहे. हे जहाज अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स आणि उरुग्वेदरम्यान चालवले जाणार आहे.

शुक्रवारी पहिल्यांदा हे जहाज प्रवाशांच्या सेवेसाठी पाण्यात उतरवले आहे. हे जहाज पूर्णपणे बॅटरी आणि इलेक्ट्रिकवर चालणार आहे. या जहाजात 2 हजार 100 प्रवासी आणि 225 गाड्या बसू शकतात. आम्ही चार दशकांपासून तस्मानियात जगातील सर्वात चांगले जहाज बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. हुल 096 जहाज हे आमचे आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाकांक्षी, सर्वात कठीण आणि सर्वात महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे, असे अनकॅटचे अध्यक्ष रॉबर्ट क्लिफोर्ड यांनी म्हटले आहे. जागतिक बाजारासाठी जेवढे शक्य होईल तेवढे टिकाऊ जहाज बनवण्याचा प्रयत्न आहे, असे क्लिफोर्ड म्हणाले.

जहाजाची वैशिष्ट्ये

हुल 096 जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक जहाज आहे. हे जहाज 130 मीटर लांब आहे. जहाजात 250 टनहून अधिक वजनाची बॅटरी आहे. या बॅटरीची क्षमता 40 मेगावॅट प्रति तास इतकी आहे. कमी कार्बन उत्सर्जन करणारे जहाज आता मोठ्या प्रमाणात तयार केले जात आहेत. या जहाजात एकाच वेळी 2100 प्रवासी आणि 225 चारचाकी गाड्या बसू शकतात. या जहाजाला होबार्टच्या समुद्रात उतरवण्यात आले आहे.