
<<< अस्मिता प्रदीप येंडे >>>
ग्रामीण ते शहरी भागाला जोडणारी, दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणजे आपली एसटी. लेखक सुनील पांडे हेही या लाल परीमधून प्रवास करणारे प्रवासी. पुणे महानगरपालिकेत कार्यरत असणारे लेखक सुनील पांडे कामानिमित्ताने नीरा ते पुणे रोज प्रवास करतात. त्यामुळे एसटीशी त्यांची भावनिक बंध आहेत. नोकरी असो वा दुसरे कोणते निमित्त असो, ते एसटीने प्रवास करतात. 20 वर्षांच्या या प्रवासात त्यांनी जे अनुभवले, निरीक्षण केले त्या स्मरणीय आठवणी त्यांनी पुस्तक रूपात शब्दबद्ध केल्या आहेत, त्या पुस्तकाचे नाव आहे, ‘जगात भारी लाल परी’.
स्नेहवर्धन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या लेखसंग्रहात 40 लेखांचा समावेश असून ‘एसटी’ या एका विषयाने संपूर्ण पुस्तक व्यापले आहे. तिची सर्वसमावेशकता, तिची क्षमता आणि महत्त्व, एसटीशी जोडल्या गेलेल्या भावना लेखकाने सहजतेने मांडल्या आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक प्रसंग घड़त असतात, विषय निर्मिती होत असते, पण ते अनुभव टिपण्याची आकलनशक्ती लेखकाकडे असते, तेव्हा असे विषय साहित्यात सामावतात. लेखक सुनील पांडे यांची आकलनशक्ती, नवनवीन विषय हाताळण्याचे कौशल्य यामुळे वाचनीय आनंद प्राप्त होतो.
लेखसंग्रहाची निवेदन शैली साधी आणि मनाला साद घालणारी आहे. पुस्तकातील काही प्रसंग हे वाचकांना संवेदनशीलतेचा अनुभव देतात, तर काही खदखद हसायला लावतात. कितीही कठीण परिस्थिती असली तरी वेळ वाचवण्यासाठी खासगी गाड्यांनी प्रवास करण्याचा मोह कसा त्रासदायक ठरतो, याची प्रचिती ‘आम्ही बारामतीकर’ या लेखातून येते. एसटीसाठी वाट पहावी लागते, पण आपण सुरक्षितरीत्या इच्छित स्थळी पोहोचतो, याची हमी देणाऱ्या लाल परीचे दर्शन लेखकाने घडवले आहे. तसेच प्रवासात जशी फसवणारी, त्रास देणारी माणसे भेटतात तशी आपुलकीने वागवणारी, मदत करणारी माणसेही भेटतात. असे अनेक प्रसंग या पुस्तकात वाचायला मिळतात.
या प्रवासात लेखकाला जसे वाईट अनुभव आले तसे सकारात्मक आणि माणुसकीचे दर्शन घडवणारे अनुभवही आले. जगात कितीही वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित झाले, रेल्वे, मेट्रो सेवा कितीही वेगवान असल्या तरी अत्यंत दुर्गम भागातही सेवा देणाऱ्या लाल परीचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. कारण सर्वसामान्यांचा ती आधारस्तंभ आहे. म्हणून ‘जगात भारी लाल परी’ हा अनुभवसंपन्न लेखसंग्रह नक्की वाचा.
जगात भारी लाल परी
लेखसंग्रह /लेखक : सुनील पांडे
प्रकाशक : स्नेहवर्धन प्रकाशन मूल्य : 250 रुपये