
<<< जे. के. पवार
ज्या प्रमाणे आनंदी, निरोगी, स्वास्थ्यपूर्ण आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे स्वयंसूचनेच्या सामर्थ्याने जीवनात सकारात्मक बदल घडविणेही तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी ‘मिरर वर्क’ अर्थात दर्पणतंत्र ही एक सर्वाधिक परिणामकारक पद्धत मानली जाते. तीच शिकवणारे पुस्तक म्हणजे ‘मिरर वर्क – दर्पणतंत्र ः मानसमंत्र.’ ‘मिरर वर्क’ म्हणजे आरशात स्वतःच्याच डोळ्यांत खोलवर, एकाग्रतेने पाहत सकारात्मक स्वयंसूचनांची पुनरावृत्ती करणे. हे एक असे दर्पणतंत्र आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता. तुम्हाला जग सुंदर आणि सुरक्षित वाटायला लागते. तुम्ही भयमुक्त होता. त्यामुळेच जीवनाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन ‘आनंदी आणि निरोगी’ करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी तंत्र आहे. पुस्तक वाचून जसजसे तुम्ही हे ‘मिरर वर्क’ म्हणजेच ‘दर्पणतंत्र’ आत्मसात कराल तसतशी तुमची ‘कृती’ आणि ‘उक्ती’ याबद्दलची जाणीव अधिक तीव्र होईल. आपले विचार, भावना, वर्तन, शब्द, वक्तव्य एकंदरीतच वागणे-बोलणे, कृती याबाबत तुम्ही अधिकाधिक संवेदनशील व्हाल. हे मिरर वर्क तुम्ही सातत्याने करीत राहिलात तर या बीजांना सुजाण मानसिक सवयींचे अंकुर फुटतात आणि या विवेकी सवयीच मग सुखी, आनंदी, परिपूर्ण जीवनाची कवाडे खुली करतात. ती करण्यासाठी वाचायलाच हवे असे हे विलक्षण पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवे.
मिरर वर्क
लेखक ः लुईस एल. हे
अनुवाद ः डॉ. रमा मराठे
प्रकाशक ः साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
पृष्ठे ः 208 n किंमत ः 250 रु.