
<<< प्रसाद ताम्हनकर
आजकाल एखादी वस्तू रोख पैसे देऊन खरेदी करणेदेखील अवघड झाले आहे. कारण तुम्ही दिलेल्या रकमेच्या बदल्यात उरलेली सुट्टी रक्कम द्यायला विक्रेत्याकडे रोख पैसेच नसतात. रिक्षा, टॅक्सी प्रवास करतानादेखील अनेकदा ही अडचण भेडसावते. “साहेब, सकाळपासून जवळपास सगळ्या ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंट केलंय. तुम्हाला 100 रुपये कुठून सुट्टे देऊ आता? तुम्ही पण करा ना ऑनलाइन पेमेंट” हे वाक्य सर्रास कानावर पडायला आणि आपण त्याला रुळायला आता सुरुवात झाली आहे.
कोरोनाच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर प्रमुख बँकांच्या मदतीने यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) बाजारात दाखल झाली आणि बघता बघता तिने बाजाराचा कब्जा घेतला. मात्र आता त्याच पेमेंट सिस्टीमवर आर्थिक गुन्हेगारांची नजर पडली असून UPI च्या माध्यमातून फसवणुकीच्या प्रकारात प्रचंड वाढ झाली आहे. 2020 ते 2023 या कालावधीत जेवढे आर्थिक गुन्हे घडले, त्यापैकी 50 टक्के गुह्यांसाठी UPI चा वापर करण्यात आला होता. गेल्या आर्थिक वर्षात UPI संबंधित फसवणुकीचे 95 हजार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्याच्या आधीच्या आर्थिक वर्षापेक्षा या गुह्यांमध्ये 77 हजार प्रकरणांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी या क्षेत्रातील सुरक्षा तज्ञांची चिंता वाढवणारी ठरली आहे.
अॅपच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करून अगदी सहजपणे पेमेंट करता येत असल्याने हिंदुस्थानात UPI प्रणाली प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या प्रणालीमध्ये कोणालाही सहज पैसे पाठवता येतात, बिलं भरता येतात, मोबाइल रिचार्ज करता येतो, अगदी बुक केलेल्या सिलिंडरचे पैसेदेखील भरता येतात. ही सुविधा वापरताना ना तुमच्या बँक खात्याची माहिती द्यावी लागत, ना तुमचा बँकेचा पासवर्ड. त्यामुळे ही साधी, सोपी प्रणाली समाजाच्या सर्व थरांत सहजतेने आपलीशी केली गेली. मुख्य म्हणजे ही सुविधा मोफत वापरता येत असल्याने तिचा वापर बघता बघता प्रचंड वेगाने वाढत गेला. आज परिस्थिती अशी आहे की, हिंदुस्थान ‘रिअल टाइम पेमेंट’ची सगळ्यात मोठी बाजारपेठ बनला आहे.
UPI चा हा सर्रास होणारा वापर गुन्हेगारांना आमंत्रण देणारा ठरला नसता तर नवलच! UPI च्या सुलभतेचा फायदा आर्थिक फसवणुकीसाठी करण्यासाठी गुन्हेगारदेखील मोठ्या प्रमाणावर सरसावले आहेत. पेमेंट करताना सर्वात महत्त्वाचा ठरणारा तुमचा UPI पिन नंबर मिळवण्यासाठी ते वाटेल त्या युक्त्या लढवतात. काही महाभागांनी तर खोटे क्यूआर कोड छापून घेतले आहेत. यापुढे मजल मारून काही गुन्हेगारांनी बँक आणि UPI ची खोटी अॅप तयार केली आहेत. हुबेहूब दिसणाऱ्या या अॅप्सच्या मदतीने ते तुमची गोपनीय माहिती सहजपणे पळवत आहेत.
या वर्षीच्या मे महिन्यापर्यंत UPI मदतीने 14 अब्ज व्यवहार करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा तब्बल 9 अब्जांनी वाढला आहे. UPI अर्थात डिजिटल पेमेंटची ही गगनाला गवसणी घालणारी झेप पाहता डिजिटल साक्षरतेत मात्र आपण खूप मागे पडलेलो आहोत अशी चिंता या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत. UPI वापरायला लोक सहजपणे शिकले आहेत, मात्र ते सुरक्षितपणे कसे वापरावे, संभाव्य फसवणुकीपासून सावध कसे राहावे, आपली UPI पिन सुरक्षित कशी ठेवावी, फसवणुकीसाठी लावलेला सापळा कसा ओळखावा अशा अनेक गोष्टी आजही लोकांना समजत नाहीत. खरे तर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत ही खरी खंत आहे.
समाज माध्यमे, दूरचित्रवाणी यांच्या माध्यमातून विविध UPI अॅप्स वापरण्यासाठी, त्याचे फायदे सांगण्यासाठी जेवढे कष्ट घेतले जातात, लोकांशी थेट संवाद साधला जातो, त्याप्रमाणे UPI आणि इतर आान लाइन व्यवहारांच्या संदर्भात लोकांच्यात जागरूकता वाढावी, सोपे पण प्रभावी ठरणारे उपाय कसे वापरावेत याची त्यांना माहिती व्हावी, गुन्हेगार कोणकोणत्या मार्गाने फसवणूक करू शकतात याचे ज्ञान त्यांच्याकडे असावे यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. यासाठी आर्थिक क्षेत्राशी संबंधित सर्व घटक आणि खुद्द सरकारनेदेखील जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे.