साहित्य जगत – कंदील

<<< रविप्रकाश कुलकर्णी

पत्रकार मधुकर भावे म्हणजे अवलिया गृहस्थ आहेत. चित्तचक्षू चमत्कारिक वाटाव्यात अशा कितीतरी हकीगती त्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’पासून त्यांनी पत्रकारिता सुरू केली. वार्ताहर ते संपादक इतका दीर्घ असा 65 वर्षांचा त्यांचा प्रवास लक्षणीयच म्हणावा लागेल. त्यातील नेमक्या आणि महत्त्वाच्या काही आठवणी त्यांनी ‘मागे वळून पाहताना’मध्ये सांगितल्या आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच डिंपल पब्लिकेशनतर्फे झाले. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका कोपऱ्यात उजळलेल्या कंदिलाचे चित्र आहे आणि वरच्या कोपऱ्यात ‘मागे वळून पाहताना’ हे शीर्षक आहे. थोडा अंधार थोडा उजळलेला प्रकाश या पार्श्वभूमीवर हे मुखपृष्ठ आकर्षक झाले आहे. पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मधुकर भावे यांनी मुखपृष्ठाचा अन्वयार्थ उलगडून दाखवला. तसेच पुस्तकाच्या आतदेखील तो त्यांनी सांगितला आहे. प्रकाशमान कंदिलाच्या खाली शब्द आहेत, “65 वर्षांपूर्वी ‘मराठा’चा वार्ताहर म्हणून मी मुंबईला निघालो तेव्हा माझ्या आईने मला सोबत एक कंदील दिला होता. त्या दिवसापर्यंत तिने मुंबई पाहिली नव्हती. माझी सगळी वाटचाल माझ्या आईने दिलेल्या त्या कंदिलाच्या प्रकाशातच झाली आहे, असेच मी मानतो. माझी आई शिकलेली नव्हती, पण तिने आम्हा चारही भावंडांना खूप काही शिकवले. त्याच कंदिलाच्या प्रकाशात अजूनही चालतोच आहे. तीच आठवण म्हणून ‘मागे वळून पाहताना!’

त्यावरून आठवलं, एकेकाळी कंदील म्हटला की, तो ‘प्रभाकर कंदील’ असंच ठरलेलं होतं. सुरुवातीला आपल्याकडे कंदील परदेशातून यायचा आणि तो तकलादू होता तसाच महागदेखील होता. अजून इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज यायची होती. सूर्यास्तानंतर प्रकाशाचे साधन म्हणजे टेंभा, भुत्या, टुकटुकी, चिमणी या नावाचे दिवे होते. परदेशी कंदील म्हणजे थोरामोठ्या श्रीमंतांची मिजास असायची.

ही उणीव ओळखून कराडच्या वीरवड्याच्या माळावर गुरुनाथ आणि श्रीपाद या ओगले बंधूंनी आधी काच निर्मितीचा प्रयोग केला आणि त्याला जोडधंदा म्हणून कंदिलाची निर्मिती केली आणि आपले वडील प्रभाकर यांच्या नावाने हा कंदील प्रसिद्ध झाला, लोकप्रिय झाला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने स्वदेशीचे आणि देशभक्तीचे वारे सुरू झालेले होतेच. त्याला धरून गुरुनाथ ओगले यांनी जाहिरात केली, “खरे देशभक्त असाल तर ‘प्रभाकर कंदील’ वापरा.’’

असा ‘प्रभाकर कंदील’ हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात तर गेलाच, पण महायुद्धात परदेशीदेखील गेला. परदेशी कंदिलाला दिलेली टक्कर संस्मरणीय ठरली. कारखान्याची भरभराट झाली आणि जे ओसाड माळरान होते ते बहरू आणि फुलू लागले. वीरवड या ग्रामाचं नाव बदलून ‘ओगलेवाडी’ असं झालं. तेव्हा कंदील म्हटलं की, तो ‘प्रभाकर कंदील’ असं ठरून गेलं होतं.

चिमणीला म्हणजे छोट्या दिव्याला पर्याय म्हणून त्या वेळी बेबी ‘प्रभाकर कंदील’ निघाला होता. तो मात्र फारसा रुजला नाही. त्याची जाहिरात होती एका कांगारूच्या हातात नेहमीचा ‘प्रभाकर कंदील’ आहे आणि त्या कांगारूच्या पोटात असलेल्या पिल्लू कांगारूच्या हातात ‘बेबी प्रभाकर कंदील’ होता.

पुढे हा कंदील आयुष्याचा कित्येक दिवस अविभाज्य भाग होता. वधुपरीक्षेच्या वेळी मुलीला कंदिलाची काच राखेने वा रांगोळीने पुसता येते की नाही हे पाहिलं जाई!

मात्र अशा या कंदिलाची नोंद साहित्यात कितीशी झाली हे पाहावे लागेल. विंदा करंदीकर काही काळ डोंबिवलीत राहत होते. रुईया कॉलेजमध्ये सकाळी साडेसातचे लेक्चर असे. त्यासाठी त्यांना साडेपाच वाजता घर सोडावं लागे. तेव्हा त्यांच्या पत्नी कंदील घेऊन स्टेशनवर सोडायला जात. पुढे पुढे विंदा स्वतःच कंदील घेऊन स्टेशनवर जात आणि विझवून स्टेशनवर ठेवत असत. एकदा घाईगडबडीत कंदिलाची वात विझवायची राहिली हे त्यांना संध्याकाळी परतताना लक्षात आलं. अकारण रॉकेल वाया गेलं म्हणून पुढे तीन-चार दिवस विंदांनी मधल्या वेळेचा चहा प्यायला नाही आणि ते नुकसान भरून काढलं. ही आठवण त्यांनीच मला एकदा सांगितली होती. त्यावर पुढे ते म्हणाले, “कोकणी स्वभाव त्याला करणार काय?’’

शन्ना नवरे हे मच्छरदाणीत गादीवर वर्तमानपत्र ठेवून त्यावर कंदील ठेवून वाचन करत असत. वर्तमानपत्र कशाला, तर  कंदिलातील रॉकेल गादीवर पडू नये म्हणून घेतलेली खबरदारी!

या प्रकाशमान गोष्टींच्या स्थित्यंतरांचा मागोवा वि.म. कुलकर्णी यांनी छान टिपला आहे. त्यांनी म्हटलंय…

नवा बदल माझ्यात घडे, एकच ठावे काम मला

प्रकाश द्यावा सकलाला, कसलेही मज रूप मिळो

देह जळो अन् जग उजळो

कवीची ही प्रार्थना प्रत्यक्षात येवो हीच कामना या क्षणी मी व्यक्त करतो, कंदिलाच्या आठवणींच्या निमित्ताने…