
हरियाणातील रेवाडी येथे राहणाऱ्या ऑटो चालकाची मुलगी लेफ्टनंट बनली आहे. जिया असे या मुलीचे नाव असून तिने कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर या यशाला गवसणी घातली आहे. लेफ्टनंट बनल्यानंतर गावात आलेल्या मुलीची गावकऱ्यांनी धमुधडाक्यात मिरवणूक काढली. तिचे जंगी स्वागत केले. लेकीने मिळवलेले यश आणि गावकऱ्यांनी केलेले जंगी स्वागत पाहून ऑटोचालक बापाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. जियाने बारावीत असताना एनडीएमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले होते. चार पाच महिन्यांचे कोचिंग आणि कठोर मेहनत घेत तिने लेखी परीक्षा उत्तीर्ण केली. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि वडिलांच्या परिश्रमामुळे मला लेफ्टनंट बनता आले, असे जिया म्हणाली. जिया रात्र दिवस अभ्यास करायची. तिचे हे यश संपूर्ण कुटुंबासाठी प्रेरणादायी आहे, असे जियाच्या बहिणीने सांगितले.