
एकीकडे आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीतील उपचारांची मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे भ्रामक जाहिरातींचे आव्हान आरोग्य मंत्रालयासमोर उभे ठाकले आहे. देशात दररोज अशा 230 पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये गंभीर आजारांवर खात्रीशीर आणि संशोधनविना उपचाराचा दावा केला जातो. आयुष मंत्रालयाच्या पोर्टलवर सुमारे 41 हजार भ्रामक जाहिरातींचा पर्दाफार्श झाला आहे.
भ्रामक दाव्यांमुळे रुग्णांची अडचण वाढते. अनेकदा रुग्ण गंभीर आजारी होणे किंवा मृत्यू होण्याची प्रकरणे समोर येतात. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी आयुष मंत्रालयाने 30 मे रोजी ‘आयुष सुरक्षा पोर्टल’ सुरू केले. गेल्या सहा महिन्यांत या पोर्टलवर आलेल्या तक्रारींच्या तपासणीत 2 हजार 81 प्रतिकूल औषध प्रतिक्रिया (एडीआर) आणि 41 हजार 572 भ्रामक जाहिराती उघडकीस आल्या. गेल्या पाच वर्षांत मंत्रालयाने 2 हजार 753 जनजागृती कार्यक्रमही आयोजित केले, ज्याचा लाभ 2.5 लाखांहून अधिक लोकांनी घेतला.
देशभरात मोठय़ा प्रमाणात लोक आयुर्वेदिक पद्धतीशी संबंधित काम करत आहेत. यामध्ये काही जण योग्य पद्धतीने काम करत असले तरी अनेक जण चुकीच्या पद्धतींचा अवलंब करतात आणि आयुर्वेदिकच्या नावावर चमत्कारी किंवा शर्तीय उपचाराचे दावे करतात. विशेषतः कॅन्सरसह इतर गंभीर आजारांवर खोटी हमी दिली जाते.


























































