सांगलीत हद्दपार उमेदवाराचे अजित पवारांसमोर शक्तिप्रदर्शन

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापुरातून काल काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळ्यांना हद्दपार केले होते. त्यात सांगलीतील अजित पवार गटाचे उमेदवार आझम काझी याचाही समावेश होता. आज सांगलीत अजित पवार यांची प्रचारसभा झाली. त्यावेळी हद्दपारीची कारवाई झालेल्या आझम काझीने त्यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करत हजेरी लावली. हद्दपार झालेली व्यक्ती प्रचार सभेला उपस्थित राहिल्याने पोलिसांच्या कारवाईवरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काझी याला सांगलीत प्रभाग क्रमांक 6 मधून अजित पवार गटातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. काल त्याच्यासह त्याच्या टोळीतील आठ जणांना हद्दपारीचे आदेश देण्यात आले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये एकमेकावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार टीका करण्यात येत आहे. आज अजित पवार यांच्या प्रचार सभेला काझी याचे पोस्टर हातात घेऊन त्याचे कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार सभास्थळी दाखल होताच त्यांनी काझीचे पोस्टर्स उंचावून घोषणाबाजी करायला सुरुवात केली. काझीने पवारांसमोर शक्तिप्रदर्शन केले, मात्र पवारांनी त्याला भेटणे टाळले.