
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘बाहुबलीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. आजही हा चित्रपट नेटकरी आवर्जून पाहतात. या चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाली तरी त्याची क्रेझ मात्र कायम आहे. त्यामुळे राजामौली यांनी “बाहुबली” या दोन्ही चित्रपटांना एकत्र करून त्याचे “बाहुबली – द एपिक” मध्ये रूपांतरित केले आहे. हा चित्रपट नवीन असला तरी तो रि रिलीज केला आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ हिंदुस्थानातच नाही तर आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालत आहे.
दिवाळी म्हटल की सिनेमा प्रदर्शनाची रांगच लागते. दिवाळी दरम्यान खूप सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यामध्येच आता ‘बाहुबली- द एपिक’ या चित्रपटाची भर पडली आहे. ‘थामा’, ‘एक दीवाने की दीवानियत’ , ‘कांतारा चैप्टर 1’ यांसारख्या चित्रपटांमध्येच 10 वर्षे जुनी कहाणी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसतेय. ‘बाहुबली- द एपिक’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात हिंदुस्थानात 24 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे.
दहा वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे अंदाजे या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ४४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईसह, “बाहुबली – द एपिक” या आठवड्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर आठव्या क्रमांकावर राहिला.



























































