बाबा रामदेव यांच्याविरोधात FIR दाखल, कोरोनील औषधाच्या भ्रामक प्रचाराचा आरोप

कोरोना आजार बरा करण्याचे औषध तयार केल्याचा दावा करणाऱ्या बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली ही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. बाबा रामदेव यांच्यासह 4 जणांविरोधात जयपूर पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. कोरोनील औषधाचा भ्रामक प्रचार केल्याचा बाबा रामदेव यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आणि त्याआधारे ही एफआयआर दाखल करून घेण्यात आली आहे.

जयपूर पोलीस ठाण्यात ज्या 5 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे त्यामध्ये आचार्य बाळकृष्ण यांचाही समावेश आहे. जयपूर शहरातील ज्योतीनगर पोलीस ठाण्यात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याव्यतिरिक्त वैज्ञानिक अनुराग वार्ष्णेय, निम्सचे अध्यक्ष डॉ.बलबीरसिंह तोमर, आणि संचालक डॉ,अनुराग तोमर यांच्याविरोधात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये कोणीही जर पतंजलीचे हे औषध विकले तर त्यावर कारवाई केली जाईल असे राजस्थानचे आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी म्हटले आहे. बाबा रामदेव यांनी कोरोना औषध बनवण्यासाठी सरकारकडून कुठलीच परवानगी घेतली नसल्याचेही शर्मा यांनी सांगितले. राजस्थान सरकारने या औषधाच्या विक्रीवर बंदी घातल्यानंतर महाराष्ट्रातही पतंजलीच्या या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

आयुष मंत्रालयाने पंतजलीला या औषधाची जाहिरात करण्यास रोखले आहे. बाबा रामदेव यांनी सर्दी खोकल्याचे औषध बनवतो असे सांगून लायसन्स घेतले आणि कोरोनाचे औषध बनवले असे उत्तराखंडच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. उत्तराखंडच्या आयुर्वेदिक आणि ड्रग्स लायन्स ऑथॉरिटीचे उपनिर्देशक यतेंद्र सिंह रावत म्हणाले की बाबा रामदेव यांच्या कंपनीला कोरोना औषधासाठी लायसन्स दिलेच नव्हते. त्यांना सर्दी खोकला आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच्या औषधासाठी लायन्सन जारी करण्यात आले होते. बाबा रामदेव यांनी कोरोनाचे औषध बनवले हे आपल्याला प्रसारित बातम्यांमधून कळाल्याचे रावत यांनी सांगितले.

पंतजलीला नोटिस

हिंदुस्थान सरकारने म्हटले आहे की कोणीही कोरोनावर औषध बनवून त्याचा प्रचार प्रसार नाही करू शकत. आयुष मंत्रालयाच्या परवानगीनंतरच औषध बनवता येईल. सध्या उत्तराखंडच्या आयुर्वेदिक आणि ड्रग्स लायन्स ऑथॉरिटीने पंतजलीला नोटीस बजावली आहे. तसेच मंगळवारी आयुष मंत्रालयानेही पंतजलीला या औषधाच्या प्रचार प्रसारावर बंदी घातली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या