
सामना प्रतिनिधी । वाराणसी
तडजोड, समझोता करण्याची वेळ आता निघून गेली आहे. कायदा करा आणि अयोध्येत राममंदिर उभारा, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी मोदी सरकारला ठणकावले आहे. राम मंदिर उभारण्यास उशीर झाला तर देशातील परिस्थिती चिघळेल, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात रामदेवबाबा हे पत्रकारांशी बोलत होते. राममंदिराचा विषय ऐरणीवर येण्यामागे राजकारण आहे का असा प्रश्न विचारताच त्यांनी या विषयावरून होत असलेल्या चर्चा भाकड असल्याचे सांगितले. अशा चर्चांमुळे देशाची संस्कृती आणि संस्कार क्षीण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. राममंदिरासारख्या आस्थेच्या विषयावर राजकीय नेत्यांनी जपूनच बोलले पाहिजे, असेही ते म्हणाले. एकीकडे देशात मूलभूत अधिकारांच्या गोष्टी केल्या जातात आणि दुसरीकडे घटनात्मक आणि नैतिक अधिकारांची टिंगलटवाळी केली असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी राम मंदिराचा मुद्दा तडजोडीने सोडवण्यात यावा यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र आता चर्चा, तडजोड, समझोत्याची वेळ निघून गेली आहे. संसदेत कायदा करून राममंदिराचे निर्माण करणे हा एकच पर्याय आता शिल्लक आहे, असे रामदेवबाबा म्हणाले. देशात जातीय तणाव नाही मात्र राम मंदिर उभारण्यास उशीर झाला तर परिस्थिती विचित्र वळण घेऊ शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.



























































